अहमदनगर : शहरातील वाडिया पार्क येथील जलतरण तलावात पोहताना एका निवृत्त लष्करी अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सागर प्रकाश कळसकर (वय ४३, रा. तापीदास, गंजबाजार, अहमदनगर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ही घटना रविवारी २ जून रोजी सकाळी साडे सहा च्या सुमारास ही घटना घडली. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सागर कळसकर हे वाडिया पार्क येथे पोहण्यासाठी आले होते. मात्र ते बराच वेळ पाण्यातून बाहेर न आल्याचे इतरांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांना पाण्यातून बाहेर काढून त्यांचे नातेवाईक राजेंद्र कळसकर यांनी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
सागर कळसकर हे बीएसएफमधून निवृत्त झाले होते. त्यांनी राजस्थानमध्ये बाडमेर येथे बीएसएफमध्ये सेवा केली होती. सागर कळसकर यांना पोहण्याचा छंद होता. ते निवृत्ती नंतर वाडिया पार्क येथे पोहण्यासाठी नेहमी येत होते. मात्र काल सकाळी जलतरण तलावात पडून त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान, सागर यांना पोहण्यासाठी तलावात उतरल्यानंतर चक्कर आली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, शवविच्छेदन अहवालानंतरच त्यांच्या मृत्यूचे कारण समोर येईल, असे पोलिसांनी सांगितले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.