धुळे : पाकिस्तानात गेलेल्या भारतीय सैन्यातील जवान चंदू चव्हाण यांनी आज धुळ्यात केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विरोधात एक वेगळे आंदोलन केले आहे. गळ्यात सरकारचा निषेध नोंदवणारी पाटी परिधान करुन चंदू चव्हाण यांनी धुळ्यात न्यायाची भीक मांगो आंदोलन केले आहे, त्यांच्या या आंदोलनाची शहरात चांगली चर्चा रंगली आहे. धुळे शहरातील विविध राजकीय पक्षांच्या कार्यालयात आपल्याला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली, गेल्या अकरा वर्षांपासून मी लढा देत असून मला केंद्र सरकारने किंवा राज्य सरकारने अद्यापही शासकीय नोकरीत सामावून घेतलेले नाही, किंवा मला कुठल्याही प्रकारची पेन्शन लागू करण्यात आलेली नाही. त्यामुळे माझ्यावर उपासमारीची वेळ आली असल्याचे सांगत चंदू चव्हाण यांनी रस्त्यावरच आंदोलन सुरू केले आहे. यावेळी, सैन्यातील जवानाच्या ड्रेसकोडमध्येच चंदू चव्हाण यांनी भीक मागो आंदोलन करून सर्वांचे लखसी वेधून घेतले आहे.
राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या विरोधात न्यायिक भीक मागून आंदोलन करीत असल्याचे सांगत मला शासनाने नोकरीत समावून घ्यावे किंवा पेन्शल लागू करावी, अशी मागणी चंदू चव्हाणने यांनी आंदोलनामार्फत केली आहे. यापूर्वीही अनेकवेळा चंदू चव्हाणने शासनाकडे विविध आंदोलनाच्या माध्यमातून आपली भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
देशाच्या सीमेवर सेवा बजावत असताना पाकिस्तानात शिरल्याने पाक लष्कराने, चंदू चव्हाण या जवानाला अटक केली होती. तीन महिन्यांच्या करावासानंतर चंदू चव्हाण यांची सुटका करण्यात आली. त्यानंतर भारतीय लष्कराने चंदू चव्हाण यांच्या विविध चौकशा केल्या आणि त्यांना नोकरीवर रुजू करुन घेतले नाही. चौकशी दरम्यान चंदू चव्हाण यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळू न शकल्याने भारताच्या लष्करातून चंदू चव्हाण यांना बरखास्त करण्यात आले होते. मात्र, काही अधिकाऱ्यांच्या चुकीच्या कारवाईमुळे आपल्याला नोकरी गमवावी लागली आहे. 11 वर्षे देशसेवा केल्यानंतर आपल्याला सेवा समाप्तीनंतरचे कोणतेही लाभ दिले गेले नसल्याने पुढील जीवन जगायचे कसे? असा सवाल उपस्थित झाल्याचे चंदू चव्हाण यांनी यावेळी म्हटले आहे.
चंदू चव्हाण कोण आहेत?
चंदू चव्हाण हे धुळे जिल्ह्यातील बोरविहीर गावचे रहिवासी असून भारतीय सीमा ओलांडून पाकिस्तानमध्ये गेल्यावर पाकिस्तानने त्यांना पकडले होते. पाकिस्तानच्या ताब्यात 3 महिने 21 दिवस होते. यावेळी त्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले होते. सरकारने मोठे प्रयत्न करून त्यांना भारतात आणले होते. आता मात्र चंदू चव्हाण यांनी भारत सरकारला आंदोलनाचा इशारा दिला आहे.