Pune Prime News : साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर (जि. जळगाव) : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २, ३ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी अमळनेर येथील साने गुरूजी साहित्य नगरी, प्रताप महाविद्यालय येथे संपन्न होत आहे. संमेलनाच्या पूर्वसंध्येला १ फेब्रुवारी २०२४ रोजी बाल मेळावा होणार आहे. बाल मेळावा आयोजनासंदर्भात बैठक नुकतीच पार पडली. हा बाल मेळावा संपूर्ण विद्यार्थी केंद्रित असेल तसेच मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी बहुमूल्य ठरेल, असे मत बाल मेळावा प्रमुख संयोजक एकनाथ आव्हाड यांनी व्यक्त केले.
या बाल मेळावा बैठकीच्या अध्यक्षस्थानी मराठी वाङ्मय मंडळाचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी होते. बाल मेळावा प्रमुख संयोजक एकनाथ आव्हाड (मुंबई) यांची प्रमुख उपस्थिती होती. बाळमेळावा समिती प्रमुख संदीप घोरपडे यांनी प्रास्ताविक केले. भैय्यासाहेब मगर यांनी सूत्रसंचालन केले. वसुंधरा लांडगे व स्नेहा एकतारे यांनी आयोजनातील प्रमुख मुद्दे मांडले. त्यानंतर बैठकीत बालमेळावा आयोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली व विविध समित्यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली.
या बैठकीस म. वा. मंडळाचे उपाध्यक्ष श्यामकांत भदाणे, कार्यवाह नरेंद्र निकुंभ, कोषाध्यक्ष प्रदीप साळवी, मंडळाचे सदस्य बन्सीलाल भागवत, बजरंग अग्रवाल, दिनेश नाईक, सतीष देशमुख, मुकेश पाटील, रमेश सोनवणे, डॉ. कुणाल पाटील, के. पी. बागुल, राहुल ब्रह्मे, वैभव आढाव, तृप्ती खैरनार, विद्या पाटील, मनोहर नेरकर, जी. एस. चौधरी आदींची उपस्थिती होती.
अशी आहे बाल मेळाव्यासाठी नियमावली
बाल मेळाव्याचे उद्घाटक एक मुलगा व एक मुलगी यांची निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी ज्यांचे साहित्य क्षेत्रात कविता, कथा किंवा इतर साहित्य प्रकाशित झाले असेल, त्या प्रकाशित झालेल्या साहित्याला कोणी नामवंतांनी गौरविले असेल अथवा एखादा साहित्यिक पुरस्कार मिळालेला असेल, अशा इयत्ता दहावीपर्यंत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी आपले प्रस्ताव सविस्तर माहितीसह पुराव्यासह मंडळाकडे पाठवावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
ज्या विद्यार्थ्यांना नाटिका वा नाट्य प्रवेश सादर करायचे असतील, त्यांनी मंडळ सांगेल त्यावेळेस तेथे उपस्थित राहून आपले प्रवेश सादर करावेत. त्यातून निवड चाचणी होऊन बाल मेळाव्यात सादरीकरणासाठी संधी मिळेल.
बाल मेळाव्यात मंच व्यवस्थापनात सहभाग नोंदवायचा असेल त्यांनी आपापली नावे मंडळाकडे ठराविक तारखेपर्यंत पाठवावीत, त्यांची कार्यशाळा घेतली जाईल व त्या कार्यशाळेतून निवड करून बालमेळाव्याच्या मंच व्यवस्थापनाच्या जबाबदाऱ्या बालकांवर टाकण्यात येतील. बाल मेळाव्यातील विविध सत्रांचे अध्यक्ष देखील आलेल्या साहित्यिक प्रस्तावातूनच निवडण्यात येतील. त्यासाठी मंडळाकडे प्रस्ताव पाठविणे आवश्यक आहे.
बाल मेळाव्यातील उद्घाटन सत्रात व समारोप सत्रातील समूहगीतांसाठी गायनाची निवड चाचणी मंडळ सांगेल त्या दिवशी व त्याच ठिकाणी घेण्यात येईल. त्यातूनच निवडक मुलांना बाल मिळाव्यात समूहगीतातील ‘खरा तो एकची धर्म’ व ‘बलसागर भारत होवो’ या गाण्यांवर समूहगीत सादर करण्यासाठी संधी मिळेल. इतर अधिकार बाल मेळावा आयोजन समितीकडे राखून ठेवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी बाल मेळावा समिती प्रमुख तसेच मराठी वाङ्मय मंडळ, अमळनेर येथे संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.