धुळे : महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाला मराठा-कुणबी आणि कुणबी- मराठा जातीचे जातप्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी 1967 पूर्वीच्या शासकीय नोंदी तपासल्या जात आहेत. त्यानुसार धुळे जिल्ह्यात आतापर्यंत 23 लाखांपेक्षा अधिक नोंदी तपासण्यात आल्या असून त्यामध्ये 75 हजारांपेक्षा अधिक कागदपत्रांमध्ये कुणबी जातीच्या नोंदी आढळून आल्या आहेत. सर्वाधिक नोंदी धुळे तालुक्यात, तर सर्वांत कमी नोंदी शिरपूर तालुक्यात आढळल्या आहेत.
राज्य शासनाने मराठा-कुणबी, कुणबी मराठा जातीचे जातप्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. तसेच मराठवाड्याच्या धर्तीवर राज्यभरात 6 नोव्हेंबरपासून 1967 पूर्वीच्या शासकीय दस्तऐवजांची तपासणी सुरू आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतु केंद्रात स्वतंत्र मराठा आरक्षण जिल्हास्तरीय कक्ष सुरु आहे. तसेच प्रत्येक तालुक्यात शासकीय नोंदीची तपासणी देखील करण्यात येत आहे. त्यानुसार आतापर्यंत 23 लाख 8 हजार 303 कागदपत्रे तपासण्यात आली. यातील 74 हजार 963 कागदपत्रांमध्ये कुणबी जातीच्या नोंदी आढळून आल्या आहेत, या कागदपत्रांची तपासणी अद्यापही सुरू आहे. तपासणीचा अहवाल राज्य सरकारला पाठवला जाणार आहे.
जिल्ह्यातील चारही तालुक्यांत सर्वाधिक कुणबी जातीच्या नोंदी जन्म, मृत्यूच्या दाखल्यासाठी नोंदवण्यात आलेल्या कागदपत्रात आढळल्या आहेत. जन्म-मृत्यूच्या 8 लाख 74 हजार 1709 नोंदीची तपासणी झाली. त्यात 46 हजार 586 नोंदी कुणबी जातीच्या आहेत. त्यामध्ये धुळे तालुक्यात 16 हजार 617, साक्री तालुक्यात 13 हजार 148, शिंदखेडा तालुक्यात 13 हजार 880 व शिरपूर तालुक्यात 2 हजार 941 नोंदी आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील नागरिकांनी त्यांच्याकडे उपलब्ध असलेले कुणबी नोंदीचे पुरावे 21 ते 24 नोव्हेंबरपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयातील विशेष कक्षात जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.