नाशिक : सध्या राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळावा, यासाठी असंख्य महिलांची धावपळ सुरू आहे. या योजनेंतर्गत २१ ते ६० वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा १५०० रुपये दिले जात आहेत. नाशिक जिल्ह्यात या योजनेअंतर्गत आतापर्यंत १४ लाख १७ हजार २५२ अर्ज प्राप्त झाले असून, त्यात पडताळणीनंतर १३ लाख ६६ हजार ६६४ अर्ज मंजूर करण्यात आले आहे. म्हणजे जवळपास ५० हजार ५८८ लाडक्या बहिणीचे अर्ज कागदपत्रांअभावी नामंजूर झाले आहेत.
राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरू करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली. या योजनेमार्फत महाराष्ट्र राज्यातील २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना दर महिना १५०० असा आर्थिक लाभ देण्यात येत आहे. या योजनेसाठी नाशिक जिल्हात आतापर्यंत १४ लाख १७ हजार २५२ अर्ज प्राप्त झाले आहेत. प्राप्त अर्जाची तालुकास्तरावर छाननी करण्यात आली असून, आतापर्यंत १३ लाख ६६ हजार ६६४ अर्जांना तालुका समितीने मान्यता दिली आहे, तर ५० हजार ५८८ अर्जामध्ये त्रुटी असल्याने अर्ज तात्पुरते अमान्य करण्यात आले असून, त्यांना पुन्हा अर्ज भरण्याची मुदत देण्यात आली आहे.
दरम्यान, तालुका समितीने स्योकृत केलेले अर्ज विधानसभा क्षेत्रनिहाय समितीकडे अंतिम निर्णयासाठी सादर करण्यात आले होते. त्यातील बहुतांश बहिणीच्या बँक खात्यावर पैसे जमा झाले आहेत. या याजनेचा लाभ मिविण्यासाठी लाभार्थी महिलेचे खाते बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे; परंतु नाशिक जिल्ह्यात सुमारे १ लाख ४३ हजार ६८३ लाभार्थी महिलांचे खाते आधार लिंक नसल्याने या लाभार्थ्यांना योजनेपासून वंचित राहावे लागले आहे. त्यातील बहुतांश लाभार्थीनी आता बँकेत जाऊन बँक खाते आधारशी लिंक केले आहे.
९३ टक्के अर्ज मंजूर
१ जुलै २०२४ पासून राज्य सरकारकडून या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी राज्यातील अनेक महिलांनी सेतू केंद्रावर आणि तहसील कार्यालयात मोठी गर्दी केली आहे. नाशिक जिल्ह्यात प्राप्त झालेल्या अर्जापैकी ७ लाख ३८ हजार १७ अर्ज हे ऑफलाइन जमा झाले असून, ६ लाख ७९ हजार २३५ अर्ज है ऑनलाइन नोंदवले गेले आहेत, त्यातील २ हजार ६७ अर्ज तपासणीचे काम सुरू आहे. जवळपास ९३ टक्के अर्ज मंजूर झाले आहे.