अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यात ह्रदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील मेंढवण गावातील तीन मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मेंढवण गावातील सोमनाथ बढे यांच्या शेतातील अर्धवट काम झालेल्या शेततळ्यात पडून तीन मुलींचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
धक्कादायक म्हणजे आजपासून राज्यभरातील शाळा सुरू झाल्या असून शाळेच्या पहिल्याच दिवशी ही दुर्घटना घडली आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
अनुष्का बडे (वय-11), सृष्टी ठापसे (वय-13) आणि वैष्णवी जाधव (वय-12) अशी मृत्यू झालेल्या तिन्ही मुलींची नावे आहेत. या घटनेनंतर स्थानिकांनी व गावकऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मुलींच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यास पाठवण्यात आले आहे.
नेमकं काय घडलं?
मेंढवण गावातील सोमनाथ बढे यांच्या खासगी शेततळ्याचं काम सुरू होतं. मात्र, काही कारणास्तव हे काम सध्या बंद असल्याने शेततळं अर्धवटच बांधण्यात आलं होतं. आज शाळेचा पहिलाच दिवस असल्याने शाळा सुटल्यानंतर फिरत फिरत तीन मुली शेततळ्याकडे गेल्या. या शेततळ्यात पावसाचं पाणी साचलं होतं. खेळत असताना पाण्यात बुडून तिन्ही मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून गावावर शोककळा पसरली आहे.