सातपूर (नाशिक) : औद्योगिक वसाहतीतील प्रबुद्धनगरमध्ये राहणाऱ्या एका १३ वर्षीय विद्यार्थ्याने मंगळवारी (दि. ६) सकाळी ९ वाजेच्या सुमारास घराच्या छताला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. दरम्यान, गावाला नेले नाही म्हणून या बालकाने जीवन संपविल्याची चर्चा आहे. अनिकेत अर्जुन पाईकराव (रा. महात्मा गांधी चौक) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, अनिकेत याचे आई-वडील गावी संभाजीनगरला गेले होते. अनिकेत व त्याचा मोठा भाऊ दोघेच घरी होते. भाऊ सकाळी शाळेत गेला असता, घरी एकट्या असलेल्या अनिकेतने गळफास घेऊन जीवन संपविले. अनिकेत इयत्ता सातवीत प्रबुद्धनगरमधील मनपा शाळेत शिकत होता.
गावाला नेले नाही म्हणून…?
आई-वडील गावाला जात असताना, अनिकेतही मला पण तुमच्या सोबत गावाला येऊ द्या, असा हट्ट करीत होता. परंतु, आई-वडील अनिकेत व त्याचा मोठा भाऊ यांना घरी ठेवून गावी गेले, याचा राग आल्याने अनिकेतने आत्महत्या केली असल्याचा अंदाज त्यांच्या भावाने व्यक्त केल्याची चर्चा परिसरातील नागरिकांमध्ये होती, मात्र त्यास दुजोरा मिळू शकला नाही.