सोलापूर: सोलापूर येथील प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉ. शिरीष वलसंगकर यांनी शुक्रवारी रात्री आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. या घटनेने वैद्यकीय समुदायात खळबळ उडाली होती. या आत्महत्ये प्रकरणी एक महत्वाची बातमी सध्या समोर आली आहे. घटनास्थळी केलेल्या तपासात डॉ. वलसंगकर यांनी लिहिलेली एक सुसाईड नोट सापडली आहे. डॉक्टर शिरीष वळसंगकर यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहिल्याचं पुढे येत आहे. दरम्यान, डॉ. वलसंगकर यांनी सुसाईड नोटमध्ये एका महिलेचा उल्लेख केला आहे.
या नोटमध्ये डॉ. वलसंगकर यांनी त्यांच्या रुग्णालयात प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करणाऱ्या मनीषा मुसळे-माने या महिलेवर गंभीर आरोप केल्याचे चिठ्ठीत उघड झाले आहे. डॉ. वलसंगकर यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिले की, “मनीषा मुसळे-माने यांनी त्यांच्यावर बदनामीकारक आरोप केले होते, ज्या महिलेला आयुष्यात उभं केलं, प्रशासकीय पदाची सूत्रं दिली त्याच महिलेने माझ्यावर घाणेरडे आरोप केले, जे ते सहन करू शकलो नाही. त्यामुळे मी जीवन संपवत आहे.”
मिळालेल्या सुसाईड नोटच्या आधारे पोलिसांनी मनीषा मुसळे-माने यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयाची परवानगी घेऊन पोलिसांनी रात्री मनीषा मुसळे-माने यांना अटक केली आहे. डॉ. वलसंगकर यांच्या मृत्यूच्या सभोवतालच्या परिस्थितीचा पोलिस तपास करत आहेत. पोलिसांनी आत्महत्येची चिठ्ठी, रक्ताचे नमुने आणि इतर संबंधित साहित्यासह पुरावे गोळा केले असून अधिक तपास केला जात आहे. या घटनेमुळे वैद्यकीय व्यावसायिकांवर येणाऱ्या दबावाबद्दल आणि आधार यंत्रणेच्या गरजेबद्दल चिंता व्यक्त झाली आहे.