Mumbai News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यानुसार वर्सोवा- वांद्रे सागरी सेतूला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देण्यात आले आहे. तर एमटीएचएलला अटलबिहारी वाजपेयी स्मृती शिवडी नाव्हा शेवा अटल सेतू असं नाव देण्यात आलं आहे. राज्यात सातशे ठिकाणी हिंदुह्यदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना उभारण्यासाठी २१० कोटी रुपयांना मान्यता देण्यात आली आहे. तर दारीद्र्यरेषेवरील पालकांच्या मुलांना देखील मोफत गणवेश वाटपाचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्याचा लाभ राज्यातील सुमारे बारा लाख विद्यार्थ्यांना मिळणार आहे.(Mumbai News)
वर्सोवा- वांद्रे सागरी सेतूला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देण्यात आले आहे.
संजय गांधी, श्रावणबाळ योजनेतील लाभधारकांच्या निवृत्तीवेतनात भरीव वाढ करण्यात आली आहे. असंघटीत कामगारांच्या कल्याणासाठी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, ज्याचा कोट्यवधी कामगारांना लाभ मिळण्याची शक्यता आहे. नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात विदर्भाचा समावेश करण्यात आला आहे.(Mumbai News) त्याचबरोबर मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे भव्य स्मारक छत्रपती संभाजीनगरमध्ये उभारण्यासाठी १०० कोटींच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी माध्यमांना मंत्रिमंडळातील निर्णयांची माहिती दिली. भामा आसखेड प्रकल्पाचे कालवे रद्द करण्याचा निर्णय या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. पाकिस्तानने पकडलेल्या मासेमाऱ्यांच्या कुटुंबीयांना उदरनिर्वाहासाठी मदत करणार असल्याची माहिती देखील मुनगंटीवार यांनी दिली.(Mumbai News)
* राज्य मंत्रिमंडळात घेण्यात आलेले महत्त्वाचे निर्णय
– वर्सोवा-वांद्रे सागरी सेतूला ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ यांचे नाव.
– मुंबई ट्रान्स हार्बर लिंक मार्गाला ‘अटलबिहारी वाजपेयी शिवडी न्हावा शेवा अटल सेतू’ असे नाव.
– राज्यात ७०० ठिकाणी ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’; २१० कोटी रुपयांना मान्यता.
– भामा आसखेड प्रकल्पाचे कालवे रद्द करणार. तीन तालुक्यातील शेतकऱ्यांना होणार लाभ.
– महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री आरोग्य योजना एकत्रित राबविणार. २ कोटी कार्ड वाटणार; आता ५ लाखांपर्यंत आरोग्य संरक्षण.
– संजय गांधी, श्रावणबाळ योजनेतील निवृत्तीवेतनात भरीव वाढ.
– आता असंघटित कामगारांच्या कल्याणासाठी महामंडळ. करोडो कामगारांना लाभ मिळणार.
– नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा; विदर्भातील जिल्ह्यांचा समावेश.
– मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे भव्य स्मारक छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे उभारणार. १०० कोटींच्या खर्चास मान्यता.
– पूर प्रतिबंधासाठी राज्यातील १६४८ किलोमीटरच्या नद्यांमधील गाळ काढणार.
– मुंबई मेट्रो-३ मार्गासाठी धारावीचा भूखंड.
– भूखंडाच्या हस्तांतरणातील अनर्जित रकमेसाठी सुधारित धोरण.
– मुखेड, उमरखेड, चिखलदरा, महाड, हरसूल, वरूड, फलटण येथे न्यायालये.
– राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यायांमध्ये अद्ययावत उत्कृष्टता केंद्र.
– सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांच्या क्लस्टरला प्रोत्साहन; पायाभूत सुविधांसाठी सिडबीशी करार.
– बीडीडी चाळ पुनर्विकासातील झोपडीधारक, स्टॉलधारकांची पात्रता निश्चित.
– जालना ते जळगाव नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्गासाठी ३५५२ कोटी खर्चास मान्यता.
– राज्यात ९ ठिकाणी नवीन शासकीय महाविद्यालये. ४३६५ कोटी खर्चास मान्यता.
– बुलडाणा येथे शासकीय कृषि महाविद्यालय.
– दीनदयाळ अंत्योदय योजना आता १४३ नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राबविणार.
– दारिद्र्यरेषेवरील पालकांच्या मुलांना देखील मोफत गणवेश देणार. १२ लाख विद्यार्थ्यांना मिळणार लाभ.
– देवळा, वैजापूर तालुक्यातील बंधाऱ्यांना मान्यता.
– चांदूर बाजार तालुक्यात लिंबूवर्गीय फळांसाठी सिट्रस इस्टेट.
– सर जे. जे. कला आणि वास्तुशास्त्र महाविद्यालय आता अभिमत विद्यापीठ.
– गंगापूर उपसा सिंचन योजनेस मान्यता.
– ग्रामपंचायत निवडणुकीत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास एक वर्षाची मुदतवाढ.
– पाकिस्तानने पकडलेल्या मासेमारी करणाऱ्यांच्या कुटुंबियांना उदरनिर्वाहासाठी मदत करणार.(Mumbai News)