सेलू (परभणी): पैशाच्या वादातून एका २७ वर्षीय युवकास मित्रांनी घरातून उचलून नेऊन पेट्रोल टाकून जिवंत जाळून मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना ६ एप्रिल रोजी रात्री शहरात घडली होती. गंभीररीत्या भाजलेल्या युवकाची सात दिवसांनंतर मृत्युशी झुंज अखेर संपली. महेश सोपान आवटे (रा. मारवाडी गल्ली) याचा उपचारादरम्यान रविवारी (दि.१३) सकाळी ९ वाजता परभणी येथील शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. दरम्यान, या प्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील मारवाडी गल्लीतील रहिवासी महेश सोपान आवटे (२७) याला ६ एप्रिल रोजी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास पैशाच्या वादातून त्याच्या मित्रांनी ऑटोरिक्षामध्ये टाकून नेले. त्यानंतर निपानी टाकळी रोडवरील उपजिल्हा रुग्णालयालगत असलेल्या शेतात त्याच्या अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळावरून एका मित्राने धूम ठोकली, तर उर्वरित दोघांनी महेशला विझवून ऑटोतून शहरातील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तर एक मित्र उपजिल्हा रुग्णालयातून पळून गेला, तर एक मित्रसोबतच राहिला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी रुग्णालयात धाव घेऊन ६ एप्रिल रोजी महेश आवटे याच्या फिर्यादीवरून सोनू पवार, सय्यद अझहर, मोबीन खान यांच्यावर सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून दोघांना तत्काळ ताब्यात घेतले. तर एकाचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. महेश आवटे यास पुढील उपचारासाठी परभणी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान रविवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. दारूच्या नशेत किरकोळ पैशांच्या कारणावरून मित्रांकडून ही घटना घडल्याने चिंता व्यक्त होत आहे. पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभाकर कवाळे हे तपास करीत आहेत.
सब से बडा रुपया?
सट्टेबाजेतून उडवलेल्या किरकोळ पैशांच्या कारणावरून नशेत असलेल्या मित्रांनी मित्राच्या अंगावर पेट्रोल टाकून जीवंत जाळले. घटनास्थळावरून तीन मित्रांपैकी दोघांनी महेश यास ऑटोमध्ये टाकून हाकेच्या अंतरावरील असलेल्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु, या घटनेवरून मित्रत्वाच्या नात्यामध्ये रुपयाच श्रेष्ठ ठरला व मित्राचा कर्दनकाळ बनला हे स्पष्ट झाले.
खुनाचा गुन्हा दाखल
महेश आवटे जळीत प्रकरणात उपचारादरम्यान महेशचा मृत्यू झाल्याने या गुन्ह्यात कलम वाढवून खुनाचा गुन्हा दाखल होऊ शकतो. या प्रकरणात पोलिसांनी तीन आरोपींपैकी दोघांना ताब्यात घेतले असून, एकाचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.