जालना : वरातीमध्ये नाचण्याच्या कारणावरून मित्रा मित्रांमध्ये झालेल्या भांडणाचे पर्यावसन एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या करण्यामध्ये झाले. शुक्रवारी रात्री जालना शहरातील चंदनझिरा पोलीस ठाणे हद्दीत ही घटना घडली. मृत युवकाचे नाव रोहन राहुल साळवे (वय १६, रा. पंचशील बुद्ध विहाराजवळ चंदनझिरा, जालना) असे आहे.
याबाबत चंदनझिरा ठाण्याचे पोलीस निरीक्षक सम्राटसिंग राजपूत यांनी सांगितले की, शुक्रवारी रात्री चंदनझिरा भागात एक लग्न होते. या लग्नात मोठ्या आवाजात डीजे लावण्यात आला होता. दरम्यान, सायंकाळी सात-आठ वाजेच्या सुमारासच पोलिसांनी या डीजे वाल्याचा लॅपटॉप जप्त केला होता. असे असताना पुन्हा रात्री या लग्नाची वरात निघाली.
वरातीमध्ये मित्रा मित्रांची भांडणे झाली. त्यामध्ये किरकोळ हाणामारी देखील झाली. वाद नको म्हणून या घटनेतील रोहन साळवे याच्या वडिलांनी म्हणजेच राहुल साळवे हे राहुलला घरी घेऊन आले. त्या पाठोपाठच रोहनचे मित्र देखील हातात काही शस्रे घेऊन रोहनच्या घरासमोर आले. तीन मजली घरासमोर हे सर्व आल्यानंतर मित्रा मित्रांमधील ही भांडणे मिटविण्यात आली.
तसेच या भांडणामध्ये रोहनचे दोन अल्पवयीन मित्र आणि अन्य दोघेजण असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान मृत युवकाच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक चौकशी केली जात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सम्राटसिंग राजपूत यांनी दिली.
आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल
रात्री उशिरा रोहन साळवे याने रात्री आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान रात्री दीड वाजता रोहन साळवे याला त्याच्या घरच्यांनी उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयांत भरती केले. परंतु तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी चंदनझिरा पोलीस ठाण्यामध्ये आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.