करमाड: करमाड येथील डीएमआयसी जवळ असलेल्या लहुकी फाट्याजवळ गुरुवारी (दि. ९) रोजी सायंकाळी साडेआठ वाजता ३५ वर्षीय अनोळखी महिलेचा मृतदेह मिळाला होता. महिलेची ओळख पटली असून तिचे नाव सुनीता कृष्णा घनघाव (३५, रा. झाल्टा, ता. छत्रपती संभाजीनगर, ह.मु. मुकुंदवाडी) असे आहे. तर खून करून फरार झालेला आरोपी रावसाहेब तान्हाजी ओळेकर (२५, रा. तळणी, ता. बदनापूर, जि. जालना. ह.मु. शेंद्रा) यानेही बदनापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. मृत महिला ही आरोपीची दुसरी पत्नी असल्याची माहिती मिळाली आहे.
घटनेबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, चार वर्षांपूर्वी रावसाहेब व सुनीताचे अनैतिक संबंध होते. सुनीता हिने रावसाहेब याच्याकडे लग्न करण्यासाठी तगादा लावला होता. परंतु, तो लग्न करण्यासाठी टाळत आहे, असे सुनीताच्या लक्षात आल्यानंतर तिने दीड वर्षांपूर्वी रावसाहेब ओळेकर याच्याविरुद्ध मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. जेलमध्ये राहून आल्यानंतर त्याने पुन्हा सुनीताशी जवळीक करून येणे-जाणे सुरू केले.
दरम्यान, रावसाहेब याने दोन वर्षांपूर्वी सातारा परिससत एका मंदिरात लग्न केले होते. परंतु, तो तिला घरी घेऊन जाण्यास नकार देत होता. सुनीता हिला तीन मुले असल्याने त्या मुलाचे काय करायचे यातून त्या दोघांत वाद होता, तर सुनीता त्यास घरी घेऊन नांदण्यास घेऊन चल, असे म्हणत होती. दरम्यान, रावसाहेब याने एक वर्षांपूर्वी जिवरख टाकळी येथील नात्यातील एका मुलीसोबत लग्नही केले होते, याचीही माहिती तिला मिळाली असल्याने त्या दोघात भांडणे वाढत चालली होती.
बुधवारी (दि. ८) रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास रावसाहेब तान्हाजी ओळेकर हा त्याची कार घेऊन सुनीताच्या घरी (मुकुंदवाडी, छत्रपती संभाजीनगर) येथे आला होता. तेव्हा सुनीता हिच्या तिन्ही मुली व मावशी अनीताबाई पठाडे असे घरी होते. तेव्हा सुनीता ही रावसाहेब यास मला तुझ्या घरी नांदावयाला घेऊन चाल, असे सांगत होती. तेव्हा रावसाहेब तिला म्हणाला की, मी तुला सध्यातरी घेऊन जाणार नाही. तू माझ्यावर केलेली बलात्काराची केस जोपर्यंत मागे घेत नाही, तोपर्यंत मी तुला माझ्या घरी घेऊन जाणार नाही, असे सांगत होता. या कारणावरून त्यांच्यात शिवीगाळ होऊन भांडण झाले. दरम्यान, रावसाहेब याने चल आपल्याला माझ्या घरी शेंद्रा येथे जायचे आहे, असे म्हणत सुनीता व रावसाहेब हे दोघे कारमध्ये बसून निघून गेले. त्यानंतर त्याने लहुकी पाटीजवळ तिचा खून करून त्यानेही गळफास घेतल्याची घटना समोर आली. करमाड पोलिसांनी घटनेची नोंद केली असून तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रताप नवघरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बनकर करीत आहेत. तसेच सुनीता हिचा झालेला खून व रावसाहेब याने केलेली आत्महत्या या संदर्भाने पोलीस तपास करीत आहेत.