छत्रपती संभाजीनगर: विधानसभा निवडणुकीत महाविकास नको आणि तिसरी आघाडीही नको. निवडणूक लढवायची की पाडायचे, याचा निर्णय अद्याप ठरलेला नाही. मात्र निवडणूक लढवायचे ठरवले, तर आमचे सगळे उमेदवार अपक्ष असतील आणि नाही ठरले तर पाडापाडी अटळच आहे, असे मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी स्पष्ट केले. मविआमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्र्यांचा चेहरा घोषित करण्यावरून खलबते सुरू आहेत. त्यासाठी शिवसेना (उबाठा) आग्रही असून, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचा (शरद पवार गट) मात्र त्यास विरोध आहे. तर रिपाइंचे नेते राजरत्न आंबेडकर यांनी, मनोज जरांगे हे आमच्या आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा असतील, असे विधान केले.
त्यावर जरांगे यांनी वरील प्रतिक्रिया दिली. जरांगे पुढे म्हणाले की, मला महायुती, मविआ व इतर आघाडीशी देणे-घेणे नाही. तुमचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना समजून सांगा. आरक्षण देणार असतील, तर मी राजकारणाचा एक शब्दही काढणार नाही. भाजप नेते आरक्षण देत नसतील, तर समाजाचे वाटोळे करणाऱ्यांसोबत राहू नका, असा आवाहन वजा इशारा जरांगे यांनी मराठा नेत्यांना दिला. तसेच तुम्हाला जे काही साम-दाम-दंड-भेद वापरायचे ते वापरा, मात्र मराठ्यांच्या नादाला लागू नका, असा पुन्हा एकदा इशारा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना दिला. विधानसभा निवडणुकीत मी कुणालाही सोडणार नाही, असे सत्ताधारी व विरोधक यांना उद्देशून ते म्हणाले.