वर्धा : वर्ध्याच्या कारंजा तालुक्यातील वाघोडा येथे सोयाबीन अन् सोन्याच्या दागिन्याची चोरी झाली आहे. वाघोड्यात नागपूर येथील गोपाल पालिवाल या शेतकऱ्याचे फार्म हाऊस आहे. सात ते आठ दरोडेखोरांच्या टोळीने शेतकऱ्याला चाकूचा धाक दाखवत दरोडा टाकला. 55 पोते सोयाबीन, सोन्याचे दागिने लुटले. यात एकजण गंभीर जखमी झाला आहे. पोटात धारदार शस्त्राने भोसकून गंभीर जखमी केले.
नारायण पालिवाल यांचे वर्ध्याच्या कारंजा तालुक्यातील वाघोडा येथील शेतात फार्महाऊस आहे. आठवड्यातून एकदा ते या फार्महाऊस वर येत असतात. त्यांचे पीक व शेतीचे उत्पन्न याच फार्महाऊस वर ठेऊन असते. रविवारी मध्यरात्री दरम्यान त्यांचा दरवाजा ठोठावला, त्यांच्या मुलाने दरवाजा उघडला. पाच ते सहा जणांची टोळी तेथे आली होती. त्यांना मारण्यास व धमकविण्यास सुरुवात केली.
यावेळी फार्महाऊस वर नारायण पालिवाल (वय 80 वर्ष) त्यांचा मुलगा गोपाल पालिवाल (वय 50) व हरिकुमारी पालिवाल (वय 70) हे हजर होते. या झटापटीत दरोडेखोरांनी गोपाल पालिवाल यांच्या पोटात चाकू खुपसला व त्याची आई हरिकुमारी पालिवाल यांच्या गळ्यातील मंगळसूत्र व कानातील दागिने हिसकावून घेतले. सोबतच तिथे ठेऊन असलेले 55 पोते सोयाबीन लंपास केले. दरोडा पडल्यानंतर दरोडेखोरांनी पालिवाल कुटुंब हे पोलिसांपर्यंत पोहचू नये, यासाठी यांच्या चारचाकी वाहनाच्या चाकातील हवा सोडली. कुणाला संपर्क करू नये यासाठी त्यांचे मोबाईल सुद्धा हिसकावून नेले.