जालना : मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला अंतरवली सराटीमधील ग्रामस्थांनी विरोध केला आहे. मनोज जरांगे हे उद्यापासून (दि.4) पुन्हा एकदा उपोषणाला बसणार होते. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी त्यांनी आतापर्यंत मोठ्या प्रमाणात आंदोलन केले होते.
मनोज जरांगे पाटील यांनी उद्या मंगळवारी (दि. 4) जूनपासून उपोषण करणार असल्याची घोषणा केली होती. त्यामुळे, उद्या 4 जूनला मनोज जरांगे उपोषणस्थळी जाऊन पुन्हा उपोषणाला बसतील. तत्पूर्वीच, गावकऱ्यांनी जरांगेंच्या उपोषणाला विरोध दर्शवत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. प्रशासनाने या उपोषणास परवानगी देऊ नये, गावात आणि परिसरात जातीय सलोखा बिघडत असल्याने उपोषणास परवानगी देऊ नये, अशी मागणी ग्रामस्थांनी या निवेदनातून केली आहे.
अंतरवाली सराटी गावच्या उपसरपंचासह 5 ग्रामपंचायत सदस्यांनी मनोज जरांगे यांच्या गावातील उपोषणाला उघडपणे विरोध केला आहे. याबाबतचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले असून या निवेदनावर 70 गावकऱ्यांच्या सह्या आहेत. त्यामुळे, मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण वादात सापडल्याचे दिसून येत आहे.