छत्रपती संभाजीनगर : मतांसाठी 1500 रुपयांत बहिणींना विकत घेतलं जात आहे. पण, राज्यातील 11 कोटी जनतेचा लाडका मुलगा, चेहरा उद्धव ठाकरे आहेत, अशा शब्दात संजय राऊत यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. वैजापूर येथील शिवसेनेच्या मेळाव्यात संजय राऊत बोलत होते. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल चढवला.
काय म्हणाले संजय राऊत?
संजय राऊत म्हणाले, वैजापूर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, कितीही आले न गेले संपले, वैजापूरचा एक गद्दार गेला त्याच काय करायचं. वैजापूरला लागलेला कलंक संपवायचा आहे. आता आम्ही वाट बगतोय विधानसभा निवडणुक कधी येतेय. या 40 गद्दारांना कसे गाडतो याची तयारी होतांना दिसत आहे. श्रद्धा आणि सबुरी आता संपली आहे. तसेच, सत्ताधाऱ्यांकडून 1500 रुपयांत बहिणीला मतांसाठी विकत घेतले जात आहे. पण, राज्यातील 11 कोटी जनतेचा लाडका मुलगा, चेहरा उद्धव ठाकरे आहेत, असे संजय राऊत यांनी यावेळी म्हटले आहे.
पुढे म्हणाले, उद्धव ठाकरे यांना जो प्रतिसाद मिळत आहे, त्यानुसार या राज्याचे सूत्र पुन्हा एकदा शिवसेनेकडे येणार आहेत. मराठवाड्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती गंभीर असून सरकार बांधावर आलं नाही. मराठ्यांचा सुपुत्र असलेले कृषिमंत्री पायाला माती लागेल म्हणून पाहणी करण्यासाठी खाली उतरले नाहीत, असंही संजय राऊत यावेळी म्हणाले.
पुतळ्याच्या कामाता भ्रष्टाचार करणारं हे सरकार
छत्रपती शिवाजी महाराज यांचा 18 कोटींचा पुतळा केवळ 12 लाख रुपयांत उभा केला. त्यामुळे वाऱ्याच्या झुळकीनं हा पुतळा पडला, पुतळ्याच्या कामाता भ्रष्टाचार करणारं हे सरकार आहे. शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे रक्षण हे करू शकले नाहीत, त्यामुळे या राज्याची सत्ता पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या निमित्ताने शिवसेनेकडे दिली पाहिजे. आम्ही पुन्हा येवू कारण वैजापूरमध्ये आमचा आमदार निवडून येणार आहे, असे संजय राऊत म्हणाले.