बीड : पत्नीची हत्या करून फरार झालेल्या पतीनेही आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शिरूर कासार तालुक्यातील आनंदवाडी येथे समोर आली आहे. पत्नीच्या हत्येनंतर पोलिसांकडून शोध सुरू असताना मंगळवारी (१७ नोव्हेंबर) रात्री संशयित पतीने स्वतःच्या शेतात कापसाच्या वाळलेल्या ढिगाला आग लावून त्यात उडी घेतली. या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला. विष्णू गणपत कदम (वय ६०) असे मृत पतीचे नाव आहे.

आनंदवाडी येथील भिवसाबाई विष्णू कदम (वय ५५) यांची सोमवारी (१६ नोव्हेंबर) पहाटे हत्या करण्यात आली होती. त्या घरातील स्वयंपाकघरात झोपलेल्या असताना पती विष्णू कदम याने घराच्या मागील दरवाजातून प्रवेश केला. त्यानंतर त्यांच्या डोक्यावर दगडाने वार करून तो घटनास्थळावरून पसार झाला.
घरातून आवाज आल्याने मुलगा आणि सून जागे झाले. त्यांनी स्वयंपाकघरात जाऊन पाहिले असता भिवसाबाई गंभीर जखमी अवस्थेत आढळल्या. त्यांना तातडीने बीड जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विष्णू कदम याचे दुसऱ्या महिलेसोबत कथित अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून पती-पत्नीत वारंवार वाद होत होते. याच वादातून पत्नीची हत्या झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली होती. घटनेनंतर संशयित पती फरार झाल्याने पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला होता.
पत्नीच्या हत्येनंतर फरार असलेल्या विष्णू कदम याने मंगळवारी रात्री स्वतःच्या शेतात कापसाच्या वाळलेल्या ढिगाला आग लावली आणि त्यात उडी घेतली. या घटनेत त्याचा मृत्यू झाला. पत्नीच्या हत्येनंतर पतीनेही आत्महत्या केल्याने आनंदवाडी परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.







