लोणी काळभोर : दुष्काळाच्या झळा आणि रखडलेल्या पाणीपुरवठा योजनांमुळे पूर्व हवेलीतील नागरिक दुहेरी संकटात सापडले आहेत. एकीकडे पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची वणवण सुरू असून दुसरीकडे पाण्याअभावी शेतातील उभी पिके जळू लागली आहेत. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे. अशा परिस्थितीत नागरिकांना दिलासा देण्यासाठी मंजूर झालेल्या तब्बल 781 कोटी रुपयांहून अधिक निधीच्या जलजीवन मिशन योजनांची कामे अद्याप पूर्णत्वास गेलेली नाहीत. तरडे आणि वळती ही दोन गावे वगळता अन्य गावांतील योजनांची प्रतीक्षा कायम आहे. या योजना वेळेत पूर्ण झाल्या असत्या, तर आजच्या पाणीटंचाईची दाहकता निश्चितच कमी झाली असती. मग पूर्व हवेलीतील नागरिकांचा पाणीप्रश्न नेमका कधी सुटणार, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.

पुणे शहराच्या पूर्व भागात गेल्या काही वर्षांत नागरीकरण आणि शहरीकरणाचा वेग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. नव्या गृहप्रकल्पांसह लोकसंख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. मात्र वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत मूलभूत सुविधांची उभारणी झालेली नाही. विशेषतः पाणीपुरवठ्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक घराला नळाद्वारे शुद्ध पाणी मिळावे, या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ‘हर घर नल से जल’ अर्थात जलजीवन मिशन योजना सुरू करण्यात आली. या योजनेंतर्गत पूर्व हवेलीतील 15 हून अधिक गावांसाठी 781 कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी मंजूर करण्यात आला. मात्र प्रशासकीय दिरंगाई आणि कामांच्या संथगतीमुळे नागरिकांना अद्यापही अपेक्षित दिलासा मिळालेला नाही.
दोन गावांमध्येच योजनेचा लाभ

पूर्व हवेलीतील 13 गावांच्या जलजीवन मिशन योजना अद्यापही पूर्ण झालेल्या नाहीत. तरडे आणि वळती या दोन गावांतील योजना पूर्ण झाल्याने तेथील नागरिकांना त्याचा लाभ मिळत आहे. नायगावच्या योजनेचा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. उर्वरित गावांमध्ये कामे रखडल्याने मंजूर निधी आणि प्रत्यक्ष पाणीपुरवठा यातील तफावत प्रकर्षाने समोर आली आहे.
80 टक्के नागरिक बोअरवेलच्या पाण्यावर अवलंबून
पूर्व हवेलीतील सुमारे 80 टक्के नागरिकांना बोअरवेल आणि विहिरींच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. अनेक ठिकाणी हे पाणी क्षारयुक्त असल्याने पिण्यासाठी त्याचा वापर करणे आरोग्याच्या दृष्टीने योग्य ठरत नाही. परिणामी नागरिकांना वॉटर प्युरिफायर किंवा आरओ प्लांटमधून पाणी विकत घ्यावे लागत आहे. त्यामुळे प्रत्येक कुटुंबाचा मासिक खर्च वाढत असून आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. उन्हाळ्यात तर परिस्थिती अधिकच बिकट होते. अनेक सोसायट्यांना टँकरने पाणी विकत घ्यावे लागते, तर काही गावांमध्ये ग्रामपंचायतीकडून दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो.
राजकीय नेत्यांचे लक्ष कधी जाणार?
दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या पूर्व हवेलीतील नागरिकांना यंदाही त्याच संकटाला सामोरे जावे लागत आहे. जलजीवन मिशनसारख्या महत्त्वाकांक्षी योजनेला कोट्यवधींचा निधी मंजूर होऊनही प्रत्यक्षात नळाला पाणी येत नसेल, तर या योजनांचा उपयोग काय, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत. पाण्याअभावी शेतकरी हतबल झाला असून उभी पिके वाळण्याच्या मार्गावर आहेत. जनावरे आणि माणसांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनत आहे. त्यामुळे केवळ आश्वासने न देता लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने या कामांना प्राधान्य देऊन कालबद्ध पद्धतीने पूर्ण करावीत, अशी मागणी होत आहे.
प्रतिक्रिया –
मागील चार महिन्यांपासून उरुळी कांचन, कोरेगाव मूळ, सोरतापवाडी, शिंदवणे आणि आळंदी म्हातोबाची येथील जलजीवन मिशन योजनांची कामे संथ झाली होती. मात्र, आता या कामांना पुन्हा गती मिळाली असून संबंधित योजनांची 50 ते 80 टक्के कामे पूर्ण झाली आहेत. निधी वेळेवर उपलब्ध झाल्यास मे २०२७ अखेरपर्यंत सर्व कामे पूर्ण करून योजना कार्यान्वित करण्यात येतील.
इखलाश शेख, उपविभागीय अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण
गावांची नावे – मंजूर निधी – (काम अपूर्ण)
लोणी काळभोर : 156 कोटी
कदमवाकवस्ती : 142 कोटीं 31 लाख 77 हजार 300 रुपयांची
थेऊर : 60 कोटी 60 लाख
कुंजीरवाडी : 59 कोटी
आळंदी म्हातोबाची : 55 कोटी
पेठ : 1 कोटी 15 लाख
कोरेगाव मूळ : 88 कोटी 12 लाख 86 हजार
उरुळी कांचन : 89 कोटी 53 लाख 2 हजार
शिंदवणे : 33 कोटी
सोरतापवाडी : 63 कोटी 36
अष्टापूर : 5 कोटी
टिळेकरवाडी : 23.5 कोटी
भवरापूर : 1 कोटी 60 लाख
गावांची नावे – मंजूर निधी – (काम पूर्ण)
तरडे : 1 कोटी 83 लाख (पूर्ण)
वळती : 1 कोटी (पूर्ण)







