लोणी काळभोर : अंदमान येथे आयोजित अंदमान सांस्कृतिक महोत्सव – कला, संस्कृती आणि सर्जनशीलतेचा भव्य उत्सव (Andaman Cultural Festival – A Grand Celebration of Talent, Culture & Creativity) या आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक महोत्सवात देवयानी शिवाजी ननवरे हिने नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत लोणी काळभोरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. आपल्या दमदार आणि आकर्षक नृत्य सादरीकरणातून तिने परीक्षकांसह उपस्थितांची मने जिंकली. तिच्या या यशामुळे ननवरे कुटुंबीयांसह परिसरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

देवयानी ही एव्हरेस्टवीर सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी ननवरे यांची कन्या असून, सध्या ती एमआयटी, लोणी काळभोर येथे शिक्षण घेत आहे. अभ्यासासोबतच नृत्यकलेची आवड जोपासताना तिने मेहनत, जिद्द आणि सातत्याच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे, शिक्षण आणि कला यांचा सुरेख समतोल साधत तिने आपल्या कलागुणांना राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर सिद्ध केले आहे.
देवयानीच्या या यशामागे नृत्य दिग्दर्शिका मनीषा साठे, सर्वेश्वरी साठे आणि आरती केदारी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी तिच्यातील नृत्यकौशल्य ओळखून त्याला योग्य दिशा दिली. तसेच तिची आई धनश्री ननवरे यांनी प्रत्येक टप्प्यावर खंबीर साथ देत तिला प्रोत्साहन दिले. कुटुंबीयांचे पाठबळ, प्रशिक्षकांचे मार्गदर्शन आणि स्वतःची मेहनत यांच्या बळावर देवयानीने प्रथम क्रमांकाचा मान मिळवला.

देवयानीच्या या यशाने एव्हरेस्टवीर शिवाजी ननवरे यांच्या कुटुंबाचा आनंद द्विगुणित झाला असून, तिच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. तिच्या या कामगिरीने विद्यार्थ्यांसमोर शिक्षणासोबतच कला आणि सांस्कृतिक क्षेत्रातही उत्तुंग भरारी घेण्याचा आदर्श निर्माण केला आहे.







