बीड : परळी शहरात जुन्या वादातून आणि कथित राजकीय वैमनस्यातून २९ वर्षीय तरुणावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने जीवघेणा हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात नगरसेवकासह अनेकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

जखमी तरुणाचे नाव अभिजीत नागेश कांबळे (वय २९) असे आहे. तो परळीतील भीमनगर परिसरातील रहिवासी असून गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून कार्यरत असल्याचे सांगितले जाते.

फिर्यादीनुसार, चांदापूर रोडवरील एका पेट्रोल पंपासमोरील हॉटेलमध्ये अभिजीत कांबळे चहा पित असताना काही जणांनी त्याच्यावर हल्ला केला. लोखंडी रॉड आणि कोयत्याने करण्यात आलेल्या मारहाणीत त्याचे दोन्ही हात आणि पाय फ्रॅक्चर झाले असून डोक्यालाही गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्यावर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या प्रकरणातील फिर्यादीने तक्रारीत गंभीर आरोप केला आहे. तक्रारीनुसार, मारहाण सुरू असताना नगरसेवक नितीन रोडे यांनी व्हिडिओ कॉलद्वारे हल्लेखोरांना “पायावर मारू नका, मुंडक्यावर मारा… त्याचं मुंडक माझ्याकडे आणा,” असे कथित निर्देश दिले. या आरोपांची अद्याप पोलिसांकडून पुष्टी झालेली नसून तपास सुरू आहे.
अभिजीत कांबळे यांच्या फिर्यादीवरून नगरसेवक नितीन रोडे, आनंद कांबळे, सुरेश चौंडे, रतन आदोडे, संतोष इंदरकर उर्फ बन्नी, रोहन उर्फ गब्बर साळवे, दत्ता कुरूप तसेच इतर काही जणांविरुद्ध परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस या हल्ल्यामागील नेमके कारण, कथित व्हिडिओ कॉलचा तपशील तसेच सर्व आरोपींची भूमिका याचा सखोल तपास करत आहेत. या प्रकरणातील आरोपांची सत्यता तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.







