भंडारा : भंडारा जिल्ह्यात ट्रॅक्स गाडी आणि आयशर ट्रकच्या जोरदार धडकेत तब्बल 8 मजुरांना आपला जीव गमवावा लागला आहे. हा अपघात लाखनी-साकोली परिसरातील पिंपळगावजवळ राष्ट्रीय महामार्गावर घडला असून, यामध्ये गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, छत्तीसगड राज्यातील काही कामगार ट्रॅक्स गाडीने नागपूरच्या दिशेने प्रवास करत होते. पिंपळगाव परिसरातील भाऊच्या ढाब्या आणि पेट्रोल पंपाजवळ आयशर ट्रक रस्त्यावर येत असताना, मागून भरधाव येणाऱ्या ट्रॅक्स चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. नियंत्रण सुटल्यामुळे ही ट्रॅक्स गाडी थेट आयशर ट्रकवर जाऊन आदळली. धडक एवढी भीषण होती की, ट्रॅक्स गाडीचा चक्काचूर झाला.

या अपघातामध्ये ट्रॅक्समधील 8 मजुरांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. अपघातातील गंभीर जखमींना तातडीने रुग्णवाहिकेतून उपचारासाठी भंडारा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे

या अपघातातील मृतक हे सर्व छत्तीसगडचे मजूर आहेत, ते नागपूरच्या दिशेने जात असताना हा भीषण अपघात झाला.
आठ जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची नॅशनल हायवे पोलिसांनी माहिती दिली आहे. उर्वरित गंभीर जखमींना भंडारा मेडिकल कॉलेजमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे.






