पुणे: दसरा सणाच्या दिवशी आपट्याची पाने सोनं म्हणून वाटण्याची परंपरा आहे. मात्र, ही परंपरा पाळताना झाडांच्या फांद्या तोडून त्यांना नुकसान पोहोचवू नका, असे आवाहन पुणे महापालिका प्रशासनाने केले आहे. आंबा, आपटा, शमी, कांचन यांसह कोणत्याही झाडाच्या फांद्या विनापरवानगी तोडल्यास संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई होऊ शकते.

दसऱ्याच्या निमित्ताने अनेक ठिकाणी आपट्याची पाने मिळवण्यासाठी झाडांच्या फांद्या तोडल्या जातात. यामुळे झाडांचे नुकसान होते आणि पर्यावरणाच्या संवर्धनास अडथळा निर्माण होतो. त्यामुळे नागरिकांनी सण साजरा करताना निसर्गाची हानी होणार नाही, याची काळजी घ्यावी. आपट्याच्या पानांऐवजी प्रतीकात्मक स्वरूपातील पर्यायी साहित्याचा वापर करण्याचाही विचार करावा.

पुणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाचे सदस्य सचिव डॉ. अशोक घोरपडे यांनी याबाबत नागरिकांना सावध केले आहे. लागू असलेल्या वृक्षसंरक्षण कायद्यानुसार विनापरवानगी झाड तोडणे, जाळणे किंवा त्याला नुकसान पोहोचवणे हा दंडनीय प्रकार ठरू शकतो. नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्तीवर कायद्यानुसार दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते.

सुधारित कायदेशीर तरतुदींनुसार, नियमबाह्य वृक्षतोडीच्या प्रकरणात झाडाच्या मूल्यांकनानुसार कमाल 1 लाख रुपयांपर्यंत दंड होण्याची शक्यता आहे. दरम्यान, दसऱ्याच्या काळात कोणी आंबा, आपटा, शमी किंवा अन्य झाडांच्या फांद्या तोडताना दिसल्यास नागरिकांनी पुणे महापालिकेकडे तक्रार करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.






