पुणे : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज 14 वा दिवस आहे.मात्र रात्री अचानक त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांच्यावर डॉक्टरांच्या पथकाकडून 24 तास उपचार सुरू आहेत. तरीही मुंबईत आंदोलकांसह धडक देण्याच्या भूमिकेवर ते ठाम आहेत.

गेल्या 4 दिवसांत सरकार आणि जरांगे यांच्यात कोणतीही चर्चा झालेली नाही. राष्ट्रवादीच्या आमदारांसोबत झालेल्या बैठकीनंतरही कोणताही तोडगा निघालेला नाही. या पार्श्वभूमीवर 12 तारखेला दुपारी 12 वाजता आंतरवालीत मराठा समाजाची महत्त्वपूर्ण बैठक होणार असून, यात आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाईल.

उपोषणादरम्यान जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर तीव्र शब्दांत टीका केली. मराठा समाजाचे नुकसान केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. दरम्यान, जरांगे यांच्या वक्तव्यानंतर सत्ताधारी नेत्यांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे. बहुतांश मागण्या मान्य केल्याचे सांगत, आता कोणतेही शासकीय शिष्टमंडळ चर्चेसाठी जाणार नाही, असे विखे पाटील यांनी स्पष्ट केले.

दरम्यान उदय सामंत आणि भरत गोगावले या मंत्र्यांनी जरांगेंच्या भाषेवर आक्षेप घेत जाहीर टीका केली आहे.दोन्ही बाजूंकडून एकमेकांवर दावे-प्रतिदावे सुरू असून बोलणी पूर्णपणे फिस्कटली आहेत. उद्याच्या बैठकीत कोणता मोठा निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







