छ. संभाजीनगर : कन्नड येथील चिंचोली लिंबाजी येथे एकाच कुटुंबातील दोन चिमुकल्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 2 वर्षांचा आयुष नारायण थोटे आणि त्याची 7 वर्षांची बहीण गायत्री नारायण थोटे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर प्रशासनाने तपासाला वेग दिला आहे.

दरम्यान, मुलांनी नेमके काय खाल्ले होते आणि त्यांच्या प्रकृतीवर कशाचा परिणाम झाला, याचा तपास सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार, आई-वडिलांनी खिचडी खाल्ली होती; मात्र मुलांनी खिचडी खाल्ली नसल्याचे कुटुंबीयांनी सांगितले आहे. त्यामुळे अन्नपदार्थांचे नमुने आणि वैद्यकीय अहवाल महत्त्वाचे ठरणार आहेत.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर फॉरेन्सिक पथक, आरोग्य विभाग आणि अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी थोटे यांच्या घरी जाऊन पाहणी केली. घरातील स्वयंपाकासाठी वापरले जाणारे तांदूळ, पीठ, हळद, तिखट तसेच इतर वस्तूंचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. हे नमुने फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले असून अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कुटुंबाने प्राथमिक उपचार घेतल्यानंतर पुढील उपचारासाठी सिल्लोडच्या दिशेने जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, प्रवासादरम्यान भराडीजवळ आयुषचा मृत्यू झाला. त्यानंतर गायत्रीला छत्रपती संभाजीनगरमधील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना शुक्रवारी तिचाही मृत्यू झाला.
या प्रकरणी पिशोर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी घरातील खाद्यपदार्थांसह काही महत्त्वाचे पुरावे ताब्यात घेतले आहेत. फॉरेन्सिक तपासणीच्या अहवालानंतर या प्रकरणातील महत्त्वाची माहिती समोर येऊ शकते.







