डॉ. अशोक बालगुडे

मांजरी खुर्द : माणिकनगर परिसरात मध्यरात्री गोठ्यात घुसलेल्या बिबट्याने बांधलेल्या वासराचा फडशा पाडल्याने मांजरी खुर्द परिसरातील शेतकरी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, शेतकरी दत्तात्रय त्रिंबक उंद्रे यांच्या घराला लागून असलेल्या गोठ्यात गाय, वासरे आणि अन्य जनावरे बांधलेली होती. गोठ्याभोवतीचे कुंपण ओलांडून बिबट्याने आत प्रवेश केला आणि वासरावर हल्ला केला. सकाळी दूध काढण्यासाठी शेतकरी गोठ्यात गेले असता वासरू मृतावस्थेत आढळून आले.घटनेची माहिती मिळताच माजी सरपंच किशोर उंद्रे यांनी वनविभागाचे कर्मचारी ज्ञानेश्वर शिळे यांना दूरध्वनीवरून माहिती दिली. वनविभागाने घटनास्थळी पाहणी करून परिसरात बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरा लावण्याची तयारी सुरू केली आहे.

बिबट्याचा वाढता वावर आणि पाळीव जनावरांवरील हल्ल्यांमुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.घराच्या उंबरठ्यापर्यंत बिबट्या येत असेल आणि गोठ्यातील जनावरेही सुरक्षित नसतील, तर वनविभागाच्या उपाययोजना नेमक्या कुठे आहेत, असा सवाल शेतकरी करीत आहेत.
मांजरी खुर्द परिसरात यापूर्वीही बिबट्याचा वावर आढळून आला आहे. त्यामुळे केवळ पिंजरा लावून औपचारिकता न करता बिबट्याचा माग काढून नागरिक व पशुधनाच्या सुरक्षेसाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.






