पुणे: आंबेगाव तालुक्यात एकाच दिवशी झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांत 3 जणांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. किरण बाबूराव डुंबरे (वय 35, रा. दावडी, ता. खेड) आणि त्यांचे मामा सासरे आनंदराव शंकर कोळेकर (वय 53, रा. करंजविहिरे, ता. खेड) अशी मृतांची नावे आहेत. किरण हे मुंबईत राहत होते. पत्नीची प्रसूती जवळ आल्याने ते तिला करंजविहिरे येथे माहेरी सोडण्यासाठी गेले होते.

पत्नीला माहेरी सोडल्यानंतर किरण आणि आनंदराव हे आळेफाटा येथील रुग्णालयात उपचार घेत असलेल्या नातेवाईकाला भेटण्यासाठी कारने निघाले. मात्र, मोरडेवाडीजवळ कारवरील नियंत्रण सुटले आणि वाहन रस्त्यालगतच्या सुमारे 20 फूट खोल दरीत जाऊन कोसळले. अपघातात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले.

दरम्यान, आंबेगाव तालुक्यातील नारायणगाव-जाधववाडी अष्टविनायक महामार्गावर दुसरी दुर्घटना घडली. जाधववाडी येथील रमेश भाऊ जाधव (वय 56) आणि तुषार सुरेश जाधव (वय 31) हे नारायणगावहून दुचाकीवरून घरी परतत होते. घरी जात असताना मागून आलेल्या भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत रमेश जाधव यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तुषार गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

एकाच दिवसात घडलेल्या या दोन्ही अपघातांमुळे आंबेगाव परिसरात शोककळा पसरली असून, महामार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.







