बीड : राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. शनिवारी बीडच्या केज तालुक्यातील मसाजोग गावच्या दौऱ्यावर आले होते. यादरम्यान सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबांची सांत्वन पर भेट घेतल्यानंतर परभणीकडे निघत असताना हा अपघात झाला.
शरद पवारांचे वाहन पुढे गेल्यानंतर ताफ्यात असलेल्या रुग्णवाहिकेनं अचानक ब्रेक दाबला, त्यामुळे रुग्णवाहिकेच्या मागे असणा-या गाड्या एकमेकांवर पाठीमागून आदळल्या. यात शरद पवार गटाचे बीडचे आमदाप संदीप क्षीरसागर यांच्या गाडीचा देखील समावेश होता. सुदैवानं या घटनेत कुणालाही दुखापत झालेली नाही. परंतु गाड्यांचे नुकसान झाले आहे.
संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांशी भेट घेतल्यानंतर शरद पवार बोलताना म्हणाले, ” ज्या तरुण सरपंचाची हत्या झाली. पंधरा वर्ष लोकांचा पाठिंब्याने त्या पदावर बसण्याचं काम ज्यांनी केलं. पंधरा वर्ष ज्याअर्थी निवड झाली त्याचा अर्थ लोकांच्या दैनंदिन सुखदुःखाची समरस होणारा, वादविवादापासून दूर राहणारा असा हा तरुण, कर्तबगार लोकप्रतिनिधी म्हणून तुमच्या गावांमध्ये काम करतोय. जे काही घडलं त्याच्यात त्यांचा काही संबंध नसताना, कोणी येऊन कोणाला दमदाटी केली. कोणाला मारहाण केली आणि त्याच्याबद्दलची तक्रार आल्यानंतर त्याची चौकशी करण्याची भूमिका घेतली आणि ती चौकशी का करतोय म्हणून कुणी बाहेरून येतं, व्यक्तिगत हल्ला केला जातो आणि शेवटी तो हल्ला हत्येपर्यंत जातो हे चित्र अतिशय गंभीर अशा प्रकारचं आहे. याची नोंद राज्य आणि केंद्र सरकारला घ्यावीच लागेल. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार कोण आहे त्याच्या मुसक्या आवळायला हव्यात.”