बीड : जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या घटनेनं खळबळ उडवली आहे. सतीश उर्फ खोक्या भोसले (Satish Bhosale) यांच्या कुटुंबावर (Beed Shirur Crime) अज्ञात टोळक्याने (Beed News) प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात चार महिला गंभीर जखमी झाल्या असून, एका महिलाची प्रकृती अत्यवस्थ असल्याची माहिती मिळाली आहे.

ही घटना शिरूर तालुक्यातील तहसील कार्यालयाजवळील गायरान वस्ती येथे घडली. मध्यरात्री साडेअकराच्या सुमारास 10 ते 15 जणांच्या टोळक्याने अचानक भोसले कुटुंबावर हल्ला चढवला. हल्लेखोरांच्या हातात दांडगे, कोयते आणि कुऱ्हाडी होत्या. त्यांनी कुटुंबातील महिलांवर थेट डोक्यावर, पाठीत आणि पायांवर वार करत अमानुष मारहाण केली. महिलांनी जीव वाचवण्यासाठी आरडाओरडा केला, मदतीसाठी किंकाळ्या फोडल्या, परंतु टोळक्याने त्याकडे दुर्लक्ष केलं आणि हल्ला सुरूच ठेवला.

जखमी महिलांनी कसाबसा पोलिस ठाण्याचा रस्ता धरला आणि शिरूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत सर्व जखमींना बीड जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केलं. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे.

प्राथमिक माहितीनुसार, “अनेक वेळा सांगूनही तुम्ही या ठिकाणी का राहता?” असा सवाल करत टोळक्याने भोसले कुटुंबाला बेदम मारहाण केल्याचं समजतं. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, आरोपींचा शोध सुरू आहे.
दरम्यान, सतीश उर्फ खोक्या भोसले हा शिरूर कासार तालुक्यातील झापेवाडीचा रहिवासी आहे. मागील पाच वर्षांपासून तो राजकारणात सक्रिय असून, भाजप आमदार सुरेश धस यांचा तो जवळचा सहकारी म्हणून ओळखला जातो. त्याच्यावर अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. काही महिन्यांपूर्वी समाज माध्यमांवर त्याचे दहशत निर्माण करणारे व्हिडिओ व्हायरल झाले होते. वनविभागाच्या कारवाईनंतर त्याच्या घरातून सापडलेल्या ऐवजामुळे तो पुन्हा चर्चेत आला होता.
अलिकडेच बुलढाणा जिल्ह्यातील कैलास वाघ या तरुणाला बॅटने मारहाण केल्याच्या प्रकरणात सतीश भोसलेला बीड न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. अशा पार्श्वभूमीवर मध्यरात्री त्याच्या कुटुंबावर झालेल्या या प्राणघातक हल्ल्यामुळे शिरूर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी तपासाची चक्रे वेगात फिरवली आहेत.







