शिरूर, ता. 12: शिरूर (Shirur Leopard Attack) तालुक्यातील पिंपरखेड गावात रविवारी (ता.12) सकाळी पावणे दहा वाजण्याच्या सुमारास बिबट्याच्या हल्ल्यात पाच वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. शिवन्या शैलेश बोंबे (वय -05) या चिमुकलीचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, शिवन्याचे आजोबा अरुण देवराम बोंबे हे घरामागील शेतात जेसीबीने काम करत होते. त्या वेळी नात पाणी देण्यासाठी शेतात आली असता, शेजारच्या ऊसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक तिच्यावर झडप टाकली. काही क्षणांतच त्याने चिमुकलीला ओढत ऊसात नेले. आजोबांनी हे भयावह दृश्य पाहताच धावत जाऊन बिबट्याच्या तावडीतून नातीला सोडवले. तत्काळ तिला उपचारासाठी मंचर उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले.

हेही वाचा: Nhavare News: वडगाव रासाईत बिबट्याचा दुचाकीस्वारावर हल्ला; पिंजरा लावून बिबट्याला पकडण्याची मागणी…..

घटनेची माहिती मिळताच माजी सहकारमंत्री दिलीपराव वळसे पाटील आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी रुग्णालयात धाव घेऊन कुटुंबीयांची भेट घेतली व सविस्तर माहिती घेतली. या घटनेनंतर पिंपरखेड परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे.
दरम्यान, ग्रामस्थांकडून वनविभागाने तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करून नागरिकांच्या जीविताचे संरक्षण करावे, अशी जोरदार मागणी केली जात आहे.







