न्हावरे: वडगाव रासाई (ता.शिरूर) परिसरातील (Nhavare News) पाटील मळा (Pune News) येथील वडगाव रासाई–मांडवगण फराटा रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकीस्वारावर बुधवारी (ता.8) संध्याकाळच्या वेळेस बिबट्याने झडप घालून हल्ला केला. या हल्ल्यात राहुल राजेंद्र शिंदे (वय २४, सध्या रा.रांजणगाव गणपती, मूळ रा.मलठण, ता.कर्जत, जि. अहिल्यानगर) हा तरुण जखमी झाला आहे.

डोक्यात हेल्मेट घातलेले असल्यामुळे राहुल शिंदे या युवकाचा जीव थोडक्यात वाचला. राहुल शिंदे हा युवक नातेवाईकांना भेटण्यासाठी मांडवगण फराटा (ता.शिरूर) येथे गेले होते. परतीच्या प्रवासात बिबट्याने अचानक समोरून झेप घेतली. या हल्ल्यात शिंदे यांची दुचाकी रस्त्यावर कोसळली आणि बिबट्याने त्यांच्या मानेवर झडप घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, डोक्यात हेल्मेट असल्यामुळे दुचाकीस्वाराच्या मानेला पकडण्याचा बिबट्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला. तसेच मागून येणाऱ्या वाहनांच्या प्रकाशामुळे बिबट्या उसात पळून गेला.या घटनेत शिंदे यांच्या हाताला व पायाला गंभीर दुखापत झाली आहे.
घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी वनविभागाला संबंधित घटनेची माहिती कळवली. मागील वर्षभरात या परिसरात बिबट्याच्या हल्ल्यांमुळे अनेकांचा बळी गेला असल्याने ग्रामस्थांनी तातडीने पिंजरा लावण्याची मागणी केली आहे.







