बीडः जिल्ह्यातील मस्साजोग (ता. केज) येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण व खून प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) वर्ग करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी ही माहिती दिली.
सरपंच संतोष देशमुख यांचा दि.९ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास केज तालुक्यातील डोनगाव फाट्याच्या पुढे टोलनाक्याजवळ आरोपी सुदर्शन घुले (रा.टाकळी ता. केज) याने साथीदारांसह अपहरण करुन खून केला होता. याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात आरोपींविरुध्द गुन्हा दाखल आहे. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत.
१० डिसेंबर रोजी पोलिसांनी धाराशिव जिल्ह्याच्या हद्दीतून आरोपी जयराम माणिक चाटे (वय २१, रा.तांबवा ता. केज) व महेश सखाराम केदार (वय २१, रा. मैंदवाडी ता.धारुर) यांना अटक केली. तर ११ डिसेंबर रोजी बीड स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी प्रतीक भीमराव घुले यास रांजणगाव (जि.पुणे) येथून अटक केली. सध्या तीनही आरोपी पोलीस कोठडीत आहेत.
दरम्यान गुरुवारी पोलीस महासंचालकांच्या आदेशाने हा गुन्हा, गुन्हे अन्वेषण विभागाकडे हस्तांतरित करण्यात आला. आता या गुन्ह्याचा पुढील तपास गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपअधीक्षक अनिल गुजर हे करीत आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी दिली.