बीड : महाराष्ट्रातील राजकारणात गेल्या काही दिवसांपासून अनेक घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर टीकाटिप्पणी केली जात आहे. असे असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. ‘गरज नसतानाही सध्या ईडीच्या चौकशीला मला सामोरे जावे लागत आहे. निवडणुका जवळ आल्याने राजकीय द्वेषापोटी माझ्यावर ईडीची कारवाई केली जात आहे. माझ्यावर कारवाई करतील, मला अटक करतील. तरी देखील मी मैदान सोडणार नाही, माझे विचार सोडणार नाही’, असे ते म्हणाले.
बीडमध्ये एका कार्यक्रमानंतर रोहित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, ”बारामती लोकसभेच्या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवार त्यांच्या कुटुंबातीलच एका व्यक्तीला तिकीट देतील आणि सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निवडणुकीत उभं करतील. अजित पवार यांनी काल जे भाषण केले त्या भाषणामध्ये त्यांच्यातला अहंकार दिसत होता. त्यामुळे सत्तेमध्ये राहून अजित पवार हे स्वतःच्या कुटुंबातील व्यक्तीला निवडून आणतील. मात्र, आम्ही लोकांना विश्वासात घेऊन या बलाढ्य शक्तीसोबत लढत राहू”.
…म्हणून शरद पवारांवर टीका
राज्यातील युवकांच्या प्रश्नावर बोललं पाहिजे, बेरोजगारी कशी संपवता येईल यासाठी त्यांनी लोकांना विश्वास दिला पाहिजे. मात्र, लोक आपल्याला स्वीकारणार नाहीत या भीतीने ते सातत्याने शरद पवार यांच्यावर टीका करत आहेत. भाजपमध्ये गेल्यामुळे त्यांना देखील भाजपच्या व्हायरसची लागण झाल्याचेही रोहित पवार म्हणाले.
पवार कुटुंबात फूट पडावी अशी भाजपची इच्छा
अजित पवार यांच्या कुटुंबातील एक व्यक्ती सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उभा राहील. पवार कुटुंबात फूट पडावी अशी भाजपची इच्छा असल्याचा दावा रोहित पवार यांनी केला. आम्ही ज्या दादांना ओळखतो ते दादा आता राहिलेले नाहीत. भाजपमध्ये जाऊन ते भाजपच्या विचारावर चालत आहेत, असेही ते म्हणाले.