Rohit Pawar : आज बीड जिल्ह्यासह राज्यात मोठा दुष्काळ असून राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे हे नेमके कुठे आहेत? हे कोणालाच माहित नाही. सरकारने शासन आपल्या दारी हे नाटक बंद करावं, लोकांच्या अडी-अडचणी जाणून घ्याव्यात, त्यावर उपाययोजना काढाव्यात, असं म्हणत शासन आपल्या दारी या कार्यक्रमावरून रोहित पवार यांनी सरकारवर चांगलाच हल्लाबोल चढवला आहे. ते बीड येथील थेरला गावात बोलत होते.(Rohit Pawar News)
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे नेते कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांची युवा संघर्ष यात्रा सुरु झाली असून ते सध्या यात्रेच्या माध्यमातून बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या संघर्ष यात्रेचा आज बीड जिल्ह्यातील दुसरा दिवस आहे. यावेळी त्यांनी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला. पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले की,राज्यातील शेतकऱ्यांना एवढ्या अडचणी असताना देखील आपले कृषिमंत्री कुठे आहेत? हे कोणालाच माहीत नाही. बऱ्याच दिवसापासून त्यांचं वक्तव्य देखील कुठं पाहायला मिळालं नाही.(Shasan Aplya Dari)
धनंजय मुंडे हे या जिल्ह्याचे नेते जरी असले. अथवा राज्याचे कृषिमंत्री असले. तरीसुद्धा सुरुवातीला फक्त 40 तालुके दुष्काळाच्या यादीत घेतले होते. खरंतर दुष्काळ जाहीर करताना राज्याचा विचार राज्य सरकारने करायला पाहिजे होता. पण हे सरकार एवढं गोंधळलेलं आहे की, पहिल्यांदा 40 तालुक्याची यादी जाहीर होते. त्यामध्ये निकष वेगळी आहेत आणि लोकांचा रोष वाढल्यानंतर दुसरी यादी जाहीर केली जाते. या सरकारला नेमकं काय चाललंय तेच कळत नाही.(Dhananjay Munde)
ते पुढे म्हणाले, हे सरकार शेतकऱ्यांची दिवाळी गोड करणार होतं. पण नेमकं कसं करणार? हे त्यांनाही माहित नाही. शेतकऱ्यांना विम्याचे पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे सरकारने लवकर मदत दिली पाहिजे. नाहीतर शेतकरी पाच टक्के व्याजाने पैसे घेईल, मग त्यानंतर या पैशाचा उपयोग काय, असं म्हणत आमदार रोहित पवार यांनी कृषिमंत्री धनंजय मुंडेंवर जोरदार टीका केली.(Ajit Pawar)