धारूर : बीड जिल्ह्यात नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. धारूर येथील पोलिस स्टेशनच्या हद्दीतील एका गावातल्या ४१ वर्षीय नराधम पित्याने स्वत:च्या मुलीवर दारू पिऊन वारंवार अत्याचार केल्याची घटना घडली आहे. मुलगी गर्भवती राहिल्यावर तिने आपल्या आईला घडलेला प्रकार सांगितला. या प्रकरणी मुलीच्या पित्यावर धारूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, धारूर पोलिस स्टेशनच्या हदीत अंबाजोगाई तालुक्यातील ही घटना आहे. हे कुटुंब ऊसतोड कामगार असून विविध साखर कारखान्यावर जाऊन ते ऊसतोडीचे काम करते. अंबाजोगाई तालुक्यातील रांजणी कारखान्यावर हे कुटुंब ऊसतोड कामगार म्हणून गेले होते. काम करत असताना अचानक मुलीच्या पोटात दुखू लागले. त्यामुळे पीडितेला ६ फेब्रुवारी २०२४ रोजी अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात दाखल केले.
डॉक्टरांनी तपासणी केली असता पीडित गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. यावेळी आईने अधिक चौकशी केल्यानंतर पीडितेने मागील आठ महिन्याखाली झालेला प्रकार सांगितलं. आई बाहेर गेल्यानंतर दारू पिऊन पित्याने अनेक वेळा मारहाण करत अत्याचार केल्याची मुलीने सांगितले. यानंतर नराधम पित्याविरोधात धारूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला असून दोन तासांत धारूर पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.