नांदेड : राज्य सरकार भ्रष्टाचारमुक्त प्रशासन देण्याचा कितीही गवगवा करत असले तरी विविध मार्गाने सरकारी बाबुंकडून सर्वसामान्यांची पिळवणूक सुरूच आहे. जनता या खाबुगिरीला कंटाळली आहे. काही भागांत तलाठी कार्यालयात तर अक्षरशः भ्रष्टाचाराचे रेट कार्डच जारी करण्यात आल्याचेही उघडकीस आले आहे. नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगरमध्ये तलाठ्याच्या भ्रष्ट आचाराचा फटका एका महिलेला बसला आहे. अशाच एका तलाठ्याने आपल्या पदाचा दुरुपयोग करून तलाठ्याने चुकीचा फेरफार तयार केल्यामुळे त्रस्त झालेल्या या महिलेच्या पतीने आत्महत्येचा टोकाचा मार्ग अवलंबला. पतीचा मृत्यू जिव्हारी लागलेल्या या महिलेने तलाठ्याला अद्दल घडविण्यासाठी त्याच्या भव्य सत्कार समारंभाची पत्रिकाच छापली. चुकीचा फेरफार तयार करून माझ्या कपाळावरचं कुंकू पुसून, माझ्या लहान लेकरांना पोरके करणाऱ्या कर्तृत्ववान इनामदार तलाठ्याचा भव्य सत्कार, अशा आशयाची ही पत्रिका सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.
‘जे नसेल ललाटी, तेही लिहितो तलाठी!’ असे म्हटले जाते. याचा प्रत्यय जोत्स्ना जाधव यांचे पती परमेश्वर जाधव यांना आला. परमोश्वर जाधव यांची हिमायतनगर शहराजवळ नऊ गुंठे जमीन होती. मात्र, त्यांच्या अशिक्षितपणाचा गैरफायदा घेत शेख इरफान आणि मिर्झा जुनेद या दोघांनी बनावट कागपत्रांद्वारे ती जमीन चक्क स्वतःच्या नावावर करुन घेत घर फसवणूक केली. यासाठी त्यांना तलाठी दत्तात्रय पुणेकर आणि मंडल अधिकाऱ्याने जमिनीचा चुकीचा फेरफार करुन दिला, असा ज्योत्स्ना जाधव यांचा आरोप आहे. या प्रकारामुळे परमेश्वर जाधव यांना धक्का बसला. यातच त्यांनी २८ नोहेंबर रोजी आत्महत्या केली.
दरम्यान, पतीच्या आत्महत्येनंतर ज्योत्स्ना जाधव यांनी पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. चुकीचा फेरफार केल्याची तक्रार दाखल केल्यानंतर उप विभागीय अधिकारी अरुणा संगेवार यांनी चुकीचा फेरफार रद्द केला; पण या प्रकारास कारणीभूत असणाऱ्या तलाठ्यावर आणि मंडल अधिकाऱ्यावर कोणतीही कारवाई केली नाही. अखेर न्याय मिळवण्यासाठी पीडित महिलेने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली.
निमंत्रणपत्रिकेत लिहिलंय काय?
अधिकाऱ्यांनी नवऱ्याला आत्महत्येस प्रवृत्त करून माझे घर उघड्यावर आणले, त्यांच्या या अमूल्य योगदानाबद्दल माझी अणि माझ्या पोरक्या मुलांची इच्छा आहे की भर चौकात बँड लावून हिमायतनगर येथील तलाठ्याचा भव्य सत्कार करावा आणि यावेळी आपणही उपस्थित राहिलात तर आम्हाला अधिक आनंद होईल.
तलाठी कार्यालय व कार्यप्रणालीबाबत जनतेमध्ये मोठा रोष आहे. भाऊसाहेबांना टोल दिल्याशिवाय कामे मार्गी लागत नाहीत. शासकीय कामांची नाममात्र फी असतांना, प्रत्येक कामासाठी वेगळे पैसे मोजावे लागतात. याचा फटका सामान्य नागरिकांना बसत आहे. आता पीडित महिलेने छापलेल्या पत्रिकेनंतरही निद्रीस्त प्रशासन जागे होणार का, दोषींवर कारवाई करणार का याची प्रतीक्षा आहे. या प्रकरणात नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची मागणी होत आहे.