Parbhani Politics : राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांची रणधुमाळी चांगलीच रंगली असून 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपताच प्रचाराला वेग आला आहे. सर्वच पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू असतानाच परभणीत एका हिंसक चकमकीने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. (Parbhani Politics Latest News )

नेमकं काय घडलं?
पाथरी तालुक्यात 21 नोव्हेंबर रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रचारादरम्यान शिवसेना शिंदे गट आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये सुरू झालेला वाद काही क्षणांतच हातापाईवर आला. सामाजिक माध्यमांवर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दोन्ही गटातील कार्यकर्ते आमनेसामने आले. सुरुवातीच्या शाब्दिक चकमकीचं रुपांतर पुढे चाकूहल्ले आणि दगडफेकीपर्यंत झालं.
हेही वाचा: अजित पवारांवर 200 कोटींच्या भ्रष्टाचाराचा थेट आरोप! थेऊर कारखान्याची 512 कोटींची जमीन…
या हल्ल्यात अनेक कार्यकर्ते गंभीर जखमी झाले असून काहींना डोक्यात गंभीर जखमा झाल्याने टाके पडले आहेत. जखमींना तत्काळ परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यापैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.
पोलीस बंदोबस्त तैनात
घटनेची माहिती मिळताच पाथरी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांकडून गस्त वाढवण्यात आली आहे.
या प्रकारावरून शिंदे गट आणि काँग्रेस नेत्यांनी एकमेकांवर गंभीर आरोपांची सरबत्ती केली आहे. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शींची विधाने आणि इतर पुरावे गोळा करण्याचे काम सुरू असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी म्हटले आहे.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर परभणीसह जिल्ह्यातील राजकीय तापमान चढले आहे. नागरिकांनी शांतता व संयम राखावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.







