शिरूर: शेतकऱ्यांच्या शेतातील इलेक्ट्रिक मोटर चोरी करून त्यातील तांब्याच्या तारा विकणाऱ्या आंतरराज्य टोळीचा शिरूर पोलिसांनी पर्दाफाश करत तब्बल २० गुन्हे उघडकीस आणले आहेत. या कारवाईत ५० किलो तांब्याच्या तारा, चोरीसाठी वापरलेले वाहन व मोटारसायकल असा सुमारे ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

शिरूर तालुक्यातील पश्चिम भागामध्ये शेतवस्ती परिसरात मागील काही दिवसांपासून इलेक्ट्रिक मोटर चोरीच्या घटना वाढल्या होत्या. २२ फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारी दरम्यान शरदवाडी (ता. शिरूर, जि. पुणे) या परिसरातील शेतकऱ्यांच्या चार मोटारी चोरीस गेल्या होत्या. या चोरीत अंदाजे १२ हजार रुपयांचे नुकसान झाले होते. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, गुप्त माहिती आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपासाची चक्रे फिरवली. तपासा दरम्यान आरोपी तांब्याच्या तारांची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर शिरूर पोलिसांनी सापळा रचून दोन आरोपींना ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये सलमान मोहम्मद इसाक (रा. उत्तर प्रदेश) आणि गौरव बारकू गावकर (रा. टाकळी हाजी, ता. शिरूर, पुणे) या आरोपींचा समावेश आहे. चौकशी दरम्यान त्यांनी साथीदार अभिषेक सुरेश रणसिंग (रा. टाकळी हाजी, ता. शिरूर, पुणे) यांच्या मदतीने मोटार चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली.
पोलिसांनी या टोळीतील एकूण तीन आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून ५० किलो तांब्याच्या तारा जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच चोरीसाठी वापरलेले मारुती सुझुकी कंपनीचे चारचाकी वाहन आणि एक मोटारसायकलही जप्त करण्यात आल्या आहेत.
तपासादरम्यान आरोपींकडून आणखी दोन साथीदारांची नावे समोर आली असून त्यांच्या शोधासाठी पोलिसांकडून विशेष पथके कार्यरत आहेत. या टोळीने शिरूर तालुक्यासह इतर भागातही अशाच प्रकारचे चोरीचे गुन्हे केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपास पथकात पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार, गोविंद खटिंग, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र चव्हाण तसेच इतर पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश होता.
दरम्यान, या कारवाईमुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केला जात असून, कृषी मोटार चोरीच्या वाढत्या घटनांवर आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.







