नवी दिल्ली: जागतिक स्तरावर सध्या अनेक आर्थिक अडचणी आणि अस्थिरतेचे वातावरण आहे. तरीही, भारतीय अर्थव्यवस्थेने या कठीण काळातही आपली दमदार कामगिरी सुरू ठेवली आहे. नवीन सरकारी आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये भारताच्या GDP वाढीचा दर 7.7 टक्के इतका राहिला आहे. विशेष म्हणजे, मागील आर्थिक वर्षात (FY25) हा दर 7.1 टक्के होता, त्यावरून देशाची आर्थिक गाडी आता अधिक वेगाने धावत असल्याचे स्पष्ट होते.

जानेवारी ते मार्च 2026 या चौथ्या तिमाहीचा विचार केला, तर देशाच्या अर्थव्यवस्थेने 7.8 टक्क्यांनी वाढ नोंदवली आहे. जर आपण आर्थिक आकड्यांकडे पाहिले, तर देशाचा वास्तविक GDP आता 323.12 लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे, जो गेल्या वर्षी 299.89 लाख कोटी रुपये होता. तसेच, नाममात्र GDP मध्ये 8.9 टक्क्यांची वाढ होऊन तो 346.36 लाख कोटी रुपयांवर गेला आहे.

या प्रगतीमध्ये सेवा क्षेत्राचा वाटा सर्वात मोठा आहे. सेवा क्षेत्रात एकूण 9.9 टक्क्यांची वाढ झाली असून, हॉटेल, पर्यटन, वाहतूक आणि व्यापार यांसारख्या सेवांनी तब्बल 12.5 टक्क्यांनी झेप घेतली आहे. आयटी (IT) आणि वित्तीय सेवा क्षेत्रानेही 10.4 टक्क्यांची चांगली प्रगती केली आहे. याशिवाय, उत्पादन क्षेत्रात 7.3 टक्के आणि बांधकामात 8.4 टक्के वाढ झाली आहे.
केवळ उत्पादनाच नाही, तर बाजारातील लोकांचा खर्च आणि कंपन्यांची गुंतवणूक यातही वाढ झाली आहे. चौथ्या तिमाहीत स्थिर भांडवली गुंतवणुकीत 10.8 टक्क्यांची वाढ झाली आहे, जे पायाभूत सुविधा आणि औद्योगिक विकासासाठी सकारात्मक चिन्ह आहे. जागतिक मंदीच्या सावटात भारताने आर्थिक स्थैर्य जपले असून, जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांमध्ये आपले स्थान अधिक मजबूत केले आहे. तज्ज्ञांच्या मते, ही विकासाची हीच गती आगामी काळातही कायम राहील.







