पुणे: पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील पाटस गावात शुक्रवारी सायंकाळी झालेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दोन गटांमधील वादाचे रूपांतर थेट हवेत गोळीबारापर्यंत गेल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत 8 जणांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाटस येथील गरदडे कॉम्प्लेक्स परिसरात सायंकाळी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी गावातील काही तरुण आणि पाटस येथील तरुण यांच्यात आधीपासून सुरू असलेल्या वादातून हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. संतोष कडू आणि सूरज कोराळकर यांच्यात सिमेंट वाहतुकीच्या व्यवसायावरून वाद निर्माण झाला होता. हा वाद वाढत गेल्यानंतर दोन्ही गट समोरासमोर आले.

घटनास्थळी दोन्ही बाजूंनी बाहेरील व्यक्तींनाही बोलावण्यात आल्याचे सांगितले जात आहे. वाद अधिक चिघळल्यानंतर एका गटाकडून गावठी पिस्तूलाचा वापर करून हवेत तीन राऊंड गोळीबार करण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. अचानक झालेल्या या गोळीबारामुळे परिसरात काही काळ दहशतीचे वातावरण निर्माण झाले.

घटनेची माहिती मिळताच यवत पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणातील 8 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. गोळीबारात कोणी जखमी झाले आहे का, याबाबतची संपूर्ण माहिती अद्याप स्पष्ट झालेली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
पुणे ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेचा सखोल तपास सुरू असून संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्याची आणि अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे. गोळीबारासाठी वापरण्यात आलेल्या शस्त्राचा उगम आणि वादामागील नेमके कारण शोधण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेनंतर पाटस परिसरात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.







