मुंबई: तुम्हीसुद्धा पार्लरमध्ये स्पा किंवा इतर कामानिमित्त जात असाल तर सावधान! नवी मुंबईतील खारघर परिसरात एका सलूनमध्ये हेअर स्पासाठी आलेल्या विवाहित महिलेसोबत धक्कादायक घटना घडली आहे. हेअर स्पा सुरू असताना सलून मालकाने महिलेच्या संमतीशिवाय तिच्या ओठांचे चुंबन घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी संबंधित सलून मालकाविरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवली येथे राहणारी 34 वर्षीय महिला 18 मे रोजी आपल्या माहेरी कळंबोली येथे आली होती. दरम्यान, 4 जून रोजी ती खारघर सेक्टर-2 परिसरातील एका सलूनमध्ये हेअर स्पा करण्यासाठी गेली होती. तक्रारीनुसार, दुपारी दीडच्या सुमारास सलून मालक समीर याने हेअर स्पा सुरू असताना महिलेला डोळे बंद करण्यास सांगितले. त्यानंतर तिच्या संमतीशिवाय जबरदस्तीने तिच्या ओठांचे चुंबन घेतल्याचा गंभीर आरोप महिलेने केला आहे.

अचानक घडलेल्या या प्रकारामुळे महिला घाबरून गेली. तिने तातडीने सलूनमधून बाहेर पडत आपल्या बहिणीला आणि कुटुंबीयांना संपूर्ण घटनेची माहिती दिली. त्यानंतर कुटुंबीयांनी संबंधित प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांकडे धाव घेतली.

महिलेने तक्रारीत म्हटले आहे की, घटनेनंतर सलून मालकाने हेअर स्पासाठी घेतलेले 3,300 रुपये परत पाठवले. तसेच मोबाईलवर “SO SORRY” असा मेसेजही पाठविल्याचा दावा महिलेने केला आहे. या मेसेजमुळे प्रकरणाला आणखी वेगळे वळण मिळाले असून पोलिसांकडून त्याचीही चौकशी केली जात आहे.
घटनेची माहिती मिळताच महिलेचे पती आणि इतर नातेवाईक खारघर पोलीस ठाण्यात पोहोचले. त्यानंतर संबंधित महिलेनेदेखील पोलीस ठाण्यात जाऊन सलून मालकाविरोधात अधिकृत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीची नोंद घेत विविध पुरावे आणि संबंधित व्यक्तींची चौकशी सुरू केली आहे.
दरम्यान, या घटनेविरोधात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला असून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.







