मुंबई : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सगेसोयऱ्यांच्या अद्यादेशाच्या अंमलबजावणीसाठी आजपासून आंदोलनाची हाक दिली आहे. आज शनिवारी राज्यभरात एक दिवस रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. सध्या सुरु असलेल्या बारावीच्या परिक्षेमुळे आंदोलनाची वेळ बदलून 11 ते 1 करण्यात आली आहे. पुढे जाऊन याच रास्ता रोको आंदोलनाचे रूपांतर धरणे आंदोलनात करण्यात येणार आहे. तसेच 25 फेब्रुवारीपासून महाराष्ट्रभर गावागावात ग्रामपंचायत किंवा मंदिरासमोर धरणे आंदोलन करण्याचे अवाहन जरांगे पाटील यांनी केले आहे. तसेच 25 पासून होणाऱ्या धरणे आंदोलनादरम्यान दररोज आपल्या सगेसोयऱ्याच्या मागण्यांचे निवेदन शासनाच्या प्रतिनिधीला द्यायचे आहे. हे निवेदन घेण्यासाठी गावात 10 च्या आत शासनाचा प्रतिनिधी आला पाहिजे तो न आल्यास ,रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असंही जरांगे पाटील म्हणाले.
दरम्यान सोलापूर, लातूर, नाशिक, अहमदनगर, बीड, संभाजीनगर, परभणी, हिंगोलीसह इतर जिल्ह्यात पाटील यांनी राज्यभर विविध ठिकाणी एक दिवसीय रास्ता रोकोच्या सूचना मराठा बांधवांना केलेल्या आहेत. या आंदोलनाचा परिणाम राज्यात विविध ठिकाणी होण्याची शक्यता आहे. मनोज जरांगे यांनी आवाहन केलेल्या आजच्या रास्ता रोको आंदोलन करणाऱ्या आंदोकांना पोलिसांकडून प्रतिबंधात्मक नोटीस देण्यात आलेल्या आहेत. सीआरपीसी 149 अन्वये या नोटीसा दिल्या आहेत. या नोटीस कायदेशीर पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येणार असल्याची माहिती आंदोलकांना देण्यात आली आहे.