धाराशिव: राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाची दुसरी यादी आज (दि. २६) जाहीर झाली. मुंबईमध्ये प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी 22 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. यामध्ये परांडा विधानसभा मतदारसंघाचे तीन वेळा प्रतिनिधित्व केलेल्या राहुल मोटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आता त्यांचा विद्यमान आमदार आणि मंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्याविरोधात होणार आहे.
गुरुवारी पुण्यातून राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाच्या पहिल्या यादीत 45 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली होती. आज (दि. २६) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी 22 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. अद्यापही पवार यांच्या पक्षाकडून काही मतदारसंघातील नावे गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत.
दरम्यान, धाराशिव जिल्ह्यातील परांडा विधानसभा मतदारसंघातून शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून दिवंगत माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचा मुलगा रणजित पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने या जागेवर दावा केला होता. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेने माघार घेतल्याची चर्चा आहे. आता परांडा मतदारसंघामध्ये आरोग्यमंत्री तानाजी सावंत विरुद्ध राहुल मोटे असा सामना होणार आहे.