केज, (बीड) : बीडमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हात उसणे दिलेल्या थकित रकमेपोटी मोटारसायकल ओढून नेल्याने एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना शुक्रवारी २६ जुलै सकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास केज तालुक्यातील सुकळी येथे घडली आहे. अमोल विलास काटकर (वय-३५) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल हा ट्रक ड्रायव्हरचे काम करत होता. अमोलने एका सावकाराकडून पैसे घेतले होते. त्यातून अमोल यांची मोटरसायकल ओढून नेली होती. यामुळे अमोल यांनी गावाशेजारी कुरण नावाने ओळखल्या जात असलेल्या शेतातील चिंचेच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली. दरम्यान, अमोल यांच्या पँटच्या खिशात एक मोबाईल आढळून आला. त्या मोबाईलच्या कव्हरमध्ये हाताने लिहिलेली एक चिठ्ठी मिळाली.
त्या चिठ्ठीमध्ये गणेश धर्मराज मुंढे (रा. पहाडी पारगाव, ता. धारूर) आणि त्याचा साथीदार रमेश देवराव थोरात (रा. सुकळी, ता. केज) या दोघांनी आपली हिरो पेंशन प्रो (एम एच-२४/ए ए-८५८७) ही मोटरसायकल ओढून नेली आहे. या मानसिक तणावातून मी आत्महत्या करत असल्याचे या चिठ्ठीत म्हटले आहे.
दरम्यान, अमोल याचे बंधू विनोद काटकर यांनी या प्रकरणी युसुफवडगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल पतंगे करीत आहेत.