बीड : माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या बंगल्यावर दगडफेक करत आंदोलकांनी गाड्या जाळल्या. त्यानंतर आता त्यांचे बंधू धैर्यशील सोळंके यांच्या बंगल्याच्या परिसरात देखील आंदोलकांकडून जाळपोळ करण्यात आली आहे. यावेळी जमावाने त्यांच्या घरातील साहित्य बाहेर काढत रस्त्यावर जाळले. यामुळे बीडमधील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न हा ऐरणीवर आला आहे.
दरम्यान बीड जिल्ह्यामध्ये अशा अनेक घटना आज दिवसभरात घडल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर सध्या बीडमध्ये संचारबंदी देखील लागू करण्यात आली. आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर मराठा समाजाने दगडफेक देखील केली. त्यानंतर बीडमधील परिस्थिती अधिकच चिघळत चालली आहे. अनेक आमदांच्या घराच्या परिसरात जाळपोळ झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
बीडमधील परिस्थिती चिघळली
बीडमधील परिस्थिती सध्या जास्त चिघळत चालली आहे. दरम्यान कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे प्रयत्न राज्य सराकरकडून करण्यात येत आहेत. त्यासाठी बीड जिल्ह्यामध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे. अनिश्चित काळासाठी ही संचारबंदी लागू करण्यात आली आहे. बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्या आदेशाने संचार बंदी लागू झाली आहे. बीडमध्ये सार्वजनिक आणि खासगी मालमत्तेचं मोठं नुकसान होत असल्याने हा निर्णय घेतला आहे.