बीड : महाराष्ट्रात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. आरक्षणासाठी राज्यात ठिकठिकाणी आंदोलने सुरु आहेत. अशातच आरक्षणासाठी आमदार आणि खासदारांच्या राजीनाम्याचे सत्र सध्या सुरु झाले आहे. मराठा आरक्षणासाठी बीड जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाच्या आमदाराने राजीनामा दिल्याची माहिती सध्या समोर आली आहे. गेवराईचे आमदार लक्ष्मण पवार यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे त्यांनी त्यांचा राजीनामा पाठवून दिला आहे.
यापूर्वी हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यातच मनोज जरांगे पाटील यांनी आमदारांना राजीनामा न देण्याचं आवाहन केलं होतं. पण तरी देखील खासदार आमदारांच्या राजीनाम्याचचे सत्र सुरुच आहे. त्यातच आता भाजप आमदारांच्या राजीनाम्यामुळे सरकारच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.
आमदार लक्ष्मण पवारांच्या राजीनाम्याच्या पत्रात काय ?
लक्ष्मण पवार यांनी विधानसभा अध्यक्षांकडे त्यांचा राजीनामा दिला आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं की, ‘महाराष्ट्रात मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय अनेक वर्षांपासून प्रलिंबित आहे. या विषयावर समाजाच्या भावना अतिशय तीव्र असून मराठा आरक्षणासाठी मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे.’