जालना : मी मराठा समाजाला सांगितले होते, साखळी उपोषण आणि आमरण उपोषण करा. मराठा समाज जे सांगेल ते काम मी करत आहे. कुठेही जाळपोळ करू नका, उद्रेक करू नका असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे. मराठा समाजाचं आंदोलन शांततेत सुरू असताना हे कोण करतेय का? ही शंका येतेय. जाळपोळ करणारे लोक हे बहुतेक सत्ताधाऱ्यांचेच कार्यकर्ते असल्याचा संशय आहे. बहुतेक सत्ताधाऱ्यांची लोक जाणून बुजून त्यांचीच घरं त्यांच्या कार्यकर्त्यांकडून जाळून घेऊ लागले आहेत, अशी शंका मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केली आहे.
मी महाराष्ट्रातील मराठा समाजाला जाहीर आवाहन करत आहे की, आज रात्री आणि उद्या दिवसा मला कुठेही जाळपोळ केल्याची किंवा नेत्याच्या घरी गेल्याची बातमी आलेली नको आहे. नाहीतर मला उद्या संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन वेगळा निर्णय जाहीर करावा लागेल. मी जाहीरपणे पुन्हा सांगतोय, आज रात्री किंवा उद्या दिवसा मला जाळपोळ केल्याची घटना ऐकू यायला नको. आरक्षण हा गोरगरीब मराठ्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. हा उगाच धिंगाणा घालण्याचा प्रश्न नाही. माझं या जाळपोळ आणि तोडफोडीला अजिबात समर्थन नाही”, असं मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.
अन्यथा मला वेगळा निर्णय घ्यावा लागेल’
“तुम्ही आज रात्री आणि उद्या सकाळी हे सर्व थांबवलं नाही तर मला उद्या संध्याकाळी वेगळा निर्णय जाहीर करावा लागेल. मी सुद्धा चौकशी करणार आहे की जाळपोळ करणारे नेमके कोण आहेत. बहुतेक जण सत्ताधाऱ्यातीलच लोकं त्यांच्या कार्यकर्त्यांकडून त्यांची घरे जाळून घेत आहेत, असा अंदाज आहे. मराठ्यांच्या शांततेच्या आंदोलनाला ते डाग लावत आहेत, ही माझी शंका शंभर टक्के खरी निघणार आहे. मी याबाबत शोध लावायला सांगतो. कारण यांना विनाकारण हे आंदोलन चिघळायचं आहे. पण हे आंदोलन चिघळू शकत नाही. सामान्य मराठे शांततेत आंदोलन करत आहेत”, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
दरम्यान “मला त्रास होणार असं मराठा समाजाने वागायला नको. तशी मराठा समाजाने काळजी घ्यावी. उद्रेक करण्याची कोणतीही गरज नाही. उद्रेक केल्याशिवाय शांततेत मराठा समाजाला आरक्षण मिळू शकतं. हे सरकार आरक्षण कसं देत नाही ते फक्त तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यात दिसेल. कोणाच्याही दारात जायचं नाही असं आपलं ठरलंय”, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
“हे सामान्य मराठे दिसत नाहीत. हे बहुतेक सत्ताधाऱ्यांचेच माणसं दिसत आहेत. आपल्याला कोणाच्या घरी जायचं नाही. जाळपोळ बंद करा. मग तु्म्ही आपल्या समाजाचे असाल किंवा सत्ताधाऱ्यांचे कार्यकर्ते असाल, जाळपोळ बंद करा. आपल्याला शांततेने गोरगरीब समाजाला न्याय द्यायचा आहे”, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.