छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा चांगलाच मुद्दा तापला असून, आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज खूपच आक्रमक झाला आहे. राज्यातील गावागावांत आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. तर काही ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे दिसत आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठवाड्यात वेगवेगळ्या जिल्ह्यात 12 बस फोडण्यात आल्या आहेत. तर जालना जिल्ह्यात महिला तहसीलदाराची गाडी देखील फोडण्यात आली आहे. तसेच बीड जिल्ह्यातील आष्टीत तहसीलदाराची गाडी अज्ञात लोकांनी पेटवून दिली आहे.
धाराशिवमध्ये 6 बसची तोडफोड
धाराशिव जिल्ह्यात देखील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक आहे. या दरम्यान धाराशिव जिल्ह्यात 6 बसवर दगडफेक करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. धाराशिव ते लातूर या बसवर रविवारी दुपारी दगडफेक करण्यात आली. तसेच, धाराशिव ते औसा या बसवर सांजा गावाजवळ,भूम आगारातील वालवड या बसवर वालवड गावातच, धाराशिव तालुक्यातील कोल्हेवाडी येथे निलंगा – पुणे, तर येडशी येथे धाराशिव -कळंब या बसवर दगडफेक करण्यात आली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यातील 144 एसटी बसच्या फेऱ्या रद्द करण्यात आले आहे.
जालन्यात 4 एसटी बस फोडल्या
धाराशिव जिल्ह्याप्रमाणे जालन जिल्ह्यातदेखील एसटी बसवर दगडफेक करण्यात आली आहे. परभणी आगाराच्या तीन बसेसवर जालन्यातील रामनगर ते मंठ्यादरम्यान दगडफेक झाली आहे. या सोबतच जालन्यातून घनसावंगीकडे जाणाऱ्या बसवर घनसावंगीत दगडफेक करण्यात आली. या सर्व पार्श्वभूमीवर जवळपास 25 फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.