जालना : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी सलग सहाव्यांदा अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केले आहे. सगेसोयरेच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करुन मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावे, या मागणीसाठी मनोज जरांगे अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले असून त्यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे.
जरांगे यांच्या पोटात पाणी आणि अन्नाचा कणही गेला नाही. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यामध्ये त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांना प्रचंड प्रमाणात थकवा जाणवत आहे. त्यांना चालणं देखील मुश्कील झालं आहे. दरम्यान, सरकारकडून मनोज जरांगेंना कोणता प्रतिसाद मिळतोय का? याकडे सर्वांचे लक्ष आहे.
मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जरांगे यांनी उपोषणाचं हत्यार उपसल्याने सरकारची कोंडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मनोज जरांगे मागील चार दिवसांपासून उपोषणाला बसले असून त्यांची प्रकृती खालावत चालली आहे.
रक्तातील साखरेचे प्रमाण कमी झाल्याने थकवा जाणवत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या वैद्यकीय पथकाने आज मनोज जरांगे यांची तपासणी केली होती. यावेळी त्यांना उपचार घेण्याची विनंती केली होती. मात्र, मनोज जरांगे यांनी उपचार घेण्यास नकार दिल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी जयश्री भुसारे यांनी सांगितले आहे.
या आहेत मागण्या?
- सगेसोयरेच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करावी.
- हैदराबाद गॅझेट लागू करावे.
- सातारा गॅझेट लागू करावे.
- बॉम्बे गव्हर्नमेंट गॅझेट लागू करावे.
- मराठा बांधवांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे सरसकट मागे घ्यावेत.