जालना : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात मराठा आंदोलक मनोज जरांगे आक्रमक झाले आहेत. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. दरम्यान, कायदा आणि सुव्यवस्था हातात घेण्याचा प्रयत्न झाल्यास पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला होता. त्याप्रमाणे जरांगे यांच्याविरोधात आता पोलिसांनी कारवाईला सुरुवात केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. रविवारी (ता. २५) रात्री पोलिसांनी मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांसह एकूण ५ जणांना ताब्यात घेतले आहे.
जरांगे पाटील यांचे निकटवर्ती अशी ओळख असलेल्या श्रीराम कुरणकर, शैलेश पवार, बाळासाहेब इंगळे यांना पोलिसांनी रात्री उशिरा ताब्यात घेतले आहे. मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कायदा आणि सुव्यवस्था हातात घेण्याचा प्रयत्न झाल्यास पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा दिला होता. त्यानंतर आता प्रशासन कामाला लागले असल्याचे पाहायला मिळत आहे.
दरम्यान, रविवारी (ता. २५) रात्री जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात संचारबंदी लावण्याचा निर्णय झाला. तसेच आता मनोज जरांगे यांच्या निकटवर्तीय यांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात येत आहे. काल रात्री उशिरा पोलिसांनी मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. दुसरीकडे फडणवीस मला जीवे मारण्याचा प्रयत्न करत असून, त्यांच्या सागर बंगल्यामोर जाऊन बसणार असल्याच्या भुमिकेवर जरांगे अद्याप ठाम आहेत. या पार्श्वभूमीवर हालचालींना वेग आला आहे.