Manoj Jarange : मराठा आरक्षण आणि समाजाच्या विविध मागण्या पूर्ण झाल्या नाही तर २९ सप्टेंबरपासून पुन्हा आमरण उपोषण करणार असल्याची घोषणा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. आज (दि. २९) अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षण आंदोलनाच्या वर्षपूर्ती निमित्त आयोजित बैठकीत मनोज जरांगे पाटील बोलत होते. यावेळी गोदाकाठच्या १२३ गावातील हजारो मराठा बांधव उपस्थित होते.
पुढे बोलताना म्हणाले, सरकारने सगे सोयरे अंमलबजावणी करावी. तसेच २००४ च्या जीआरची दुरुस्ती करावी. त्यामध्ये शिथिलता आणावी. २९ सप्टेंबरच्या आत हैद्राबाद, सातारा, बाँबे गॅझेट लागू करावी, या मागण्या सरकारने पूर्ण कराव्यात. मराठ्यांच्या विरोधात बोलणारे भाजपचे सगळे आमदार पाडा. आता आरपारची लढाई होणार आहे. मराठ्यांनी अशीच एकजुट ठेवा. राजकारणासाठी एकजूट फुटू देऊ नका, असे आवाहन मनोज जरांगे यांनी यावेळी केले आहे.
पुढे म्हणाले, समितीला मुदतवाढ देऊनही ही समिती रेकॉर्ड तपासत नाही. सगे सोयरे अंमलबजावणी केली नाही. मराठा आरक्षण द्या, नाहीतर काँग्रेसचे आधी जसे हाल झाले होते, तसे हाल भाजपचे होतील, असा इशाराच मनोज जरंगे यांनी दिला आहे. सगे सोयरे आरक्षण कायद्यात बसत नाही म्हणता, मग तुम्ही राज्यपालांच्या स्वाक्षरीने अधिसूचना काढली कशी? टिकत नव्हती, तर तेंव्हाच काढायची नव्हती असा सवाल देखील यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे.